टॉप-टू स्थानच विजेतेपदाची गॅरंटी! आयपीएलच्या इतिहासात 15 वेळा टॉप टूच ठरलेत विजेते, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ केवळ दोनदाच जिंकलेत

आयपीएल आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय तरी गुणतालिकेतील अक्वल दोन (टॉप टू) संघ ठरलेले नाहीत. प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या चारही संघांमध्ये टॉप टू स्थानासाठी रस्सीखेच अजून सुरूच आहे. टॉप टू जो पक्का करतो, तोच विजेता ठरतो. आयपीएलचा गेल्या 17 वर्षांचा इतिहास पाहाता चक्क 15 वेळा टॉप टूच विजेते ठरलेत. म्हणजेच टॉप टू ही जेतेपदाची गॅरंटी आहे, यावर सर्वांनीच शिक्कामोर्तब केलेय. त्यामुळेच गुणतालिकेत अक्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांची जी धडपड असते, ती धडपड त्यांना विजेतेपदाची भेट देते. हेच 17 पैकी 15 वेळा खरं ठरलंय.

आयपीएलच्या पहिल्या मोसमात म्हणजे 2008 साली प्ले ऑफचे सामने नव्हते. तेव्हा टॉपचे चार संघ बाद फेरीत पोहोचायचे आणि त्यांच्यात उपांत्य सामना खेळविला जायचा. पहिल्या आयपीएलचे विजेतेपद राजस्थान रॉयल्सने पटकावले होते आणि तोच गटातही अक्वल होता. दुसऱ्या वर्षी चौथ्या क्रमांकावर असलेल्या डेक्कन चार्जर्सने बाजी मारली होती. मग तिसऱ्या वर्षी प्ले ऑफचे सामने सुरू झाले. म्हणजेच क्वालिफायर आणि एलिमिनीटरचे सामने सुरू झाले. यात तिसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने आपले पहिलेवहिले विजेतेपद संपादले. मग पुढच्या वर्षी चेन्नईने टॉप टूमध्ये स्थान मिळवत आपले जेतेपद राखण्याचा करिश्मा केला.

आयपीएलची पहिली दोन वर्षे वगळता टॉप टूमध्ये असलेले संघ विजेते ठरलेत. मग हे संघ कोणतेही असू देत. त्यामुळे आजवर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याबरोबर टॉप टूमध्ये  आपले स्थान पक्के करणेही प्रत्येक संघाचे लक्ष्य असते. कारण अक्वल दोन संघांनाच पराभवानंतरही अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची क्वालिफायर टूच्या रुपाने संधी मिळते आणि इथेच ते बाजी मारतात. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाना अशी संधीच नसल्यामुळे ते नेहमीच जेतेपदापासून दूर राहिले आहेत. पुढेही राहणार.

दहा वेळा जेतेपदाची लढत टॉप टूमध्ये

टॉप टूच्या संघांचे नशीब इतके बलवत्तर असते की हे स्थान जणू त्यांच्यासाठी जेतेपदाची खात्रीच. त्यामुळे 17 पैकी 10 वेळा अक्वल दोन संघच जेतेपदासाठी भिडलेत. 2013 साली प्रथमच अक्वल असलेल्या मुंबई आणि चेन्नई यांच्यात प्ले ऑफच्या लढतीनंतर जेतेपदाचीही लढत रंगला. याचाच अर्थ टॉप टू म्हणजेच अंतिम सामना. हे गेल्या 12 वर्षात दहावेळा खरं ठरलं आहे. गुणतालिकेत मुंबई आणि चेन्नई हे दोन बलाढय़ संघ अनेकदा टॉप टू असतात आणि त्यांच्यातच अंतिम लढतही खेळली जाते. 2013 नंतर 2015, 2019 या तिन्ही वेळेला हे दोन्ही संघ अक्वल दोन स्थान निश्चित करत प्ले ऑफमध्ये भिडले आणि नंतर अंतिम लढतही खेळलेत. यंदाही जो टॉप टूची जेतेपदाची परंपरा कायम राहणार हे कुणीही सांगू शकतो. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले संघ जिंकले तर हा आश्चर्याचा धक्का असेल.