दरवर्षी निवडणुका घ्या, जनता खूश राहील! संसदेतील चर्चेत विशाल पाटील यांची टोलेबाजी

बेहिशेबी पैसे वाटूनच निवडणुका करायच्या असतील तर मग देशात दरवर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घ्या. निवडणूक लढणाऱ्यांचे काय व्हायचे ते होऊ द्या, किमान जनता तरी खूश राहील, अशी उपरोधिक टोलेबाजी खासदार विशाल पाटील यांनी आज संसद अधिवेशनात केली.

बिहार विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर महिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये पाठवण्यात आले. ही योजना जुनी असल्याचे सांगितले गेले. मात्र, पहिलाच हप्ता आचारसंहिताकाळात दिला गेला, यावर खासदार पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. आधी मतांची चोरी आणि मग मतांची खरेदी करून सरकार बनवायचे असेल आणि मते विकत घेऊनच निवडणुका करायच्या असतील तर होऊ दे दरवर्षी निवडणूक, असा टोला त्यांनी लगावला.

पाटील म्हणाले, ‘जगातील अनेक देशांमध्ये निवडणूक आयुक्त न्यायपालिकेतून निवडले जातात. काही ठिकाणी निवडणूक आयुक्त निवडीसाठीच्या समितीत न्यायाधीश असतात. आपल्याकडे 2023 पर्यंत अशी व्यवस्था होती. मात्र, ती बंद का केली गेली? सत्ताधारी पक्ष काँग्रेसच्या काळात हे झाले, ते झाले, असे सांगत आहेत, मग त्यात सुधारणा का करत नाहीत? तुम्ही तसे केले म्हणून आम्ही असे करू, हे काही चांगले नाही. ‘डोळ्याच्या बदल्यात डोळे मागायला गेलात तर हे जग आंधळे होऊन जाईल. बीएलओ कामाच्या ओझ्याने नाही मेले, ते मतदार यादीत गडबड करून करून मेले. निवडणुकीतील खर्चाबाबत काहीच डेटा उपलब्ध होत नाही. किती खर्च झाला कळत नाही. बेहिशेबी खर्च करायचाच असेल तर मग विधानसभा, लोकसभा निवडणुका दरवर्षी घ्या,’ असा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावला.