Holi 2026 – होळीचे रंग खरेदी करताना काय लक्षात ठेवायला हवं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. पण बाजारात मिळणारे सर्व रंग सुरक्षित असतीलच असे नाही. त्वचा, डोळे आणि केसांचे नुकसान टाळण्यासाठी रंग खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बाजारातील रासायनिक रंगामुळे डोळे, त्वचा, केस, कान यांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमस्वरुपी अपंगत्वाचाही धोका संभवतो.

रासायनिक रंगांमध्ये शिसे, पारा, क्रोमियमसारखी हानिकारक द्रव्ये असू शकतात. त्यामुळे शक्यतो हर्बल किंवा नैसर्गिक रंग घ्या. फुलांपासून, हळद, बीट, पालक अशा घटकांपासून बनवलेले रंग त्वचेसाठी सुरक्षित असतात. पॅकेटवर हर्बल किंवा आॅरगॅनिक असा उल्लेख आहे का ते तपासा.

रंग खरेदी करताना पॅकेटवर उत्पादकाचे नाव, पत्ता आणि मानांकन आहे का ते पाहा. बनावट किंवा उघड्यावर विकले जाणारे रंग टाळा. सीलबंद पॅकच घ्यावा.

अतिशय तीव्र वास येणारे किंवा खूप खरबरीत पोत असलेले रंग त्वचेला त्रास देऊ शकतात. मऊ, बारीक आणि सुगंध नसलेले रंग अधिक सुरक्षित असतात.

पाण्यात मिसळले जाणारे रंग त्वचेला जास्त चिकटतात. शक्यतो कोरडे गुलाल वापरणे उत्तम. डोळ्यांमध्ये किंवा तोंडात रंग जाणार नाही याची काळजी घ्या.

रंग लावण्यापूर्वी त्वचेवर नारळाचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावा. केसांवरही तेल लावल्यास रंग कमी चिकटतो. डोळे आणि चेहरा सुरक्षित ठेवण्यासाठी सनग्लासेस वापरू शकता.

लहान मुलांची त्वचा नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या साठी फक्त नैसर्गिक आणि सौम्य रंगच वापरावेत. केमिकल रंगांपासून त्यांना दूर ठेवा.