पुन्हा कोरोनाची लाट! हाँगकाँग, सिंगापूरमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

जगभरात हाहाकार माजवणाऱया कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून, त्यामुळे आशिया खंडात कोरोनाच्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.

कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये 2019 मध्ये झाली आणि 2020 मध्ये जगभर हा विषाणू पसरला. कोटय़वधी लोकांचा बळी कोरोनाने घेतला. जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली. 2022 पासून जग हळूहळू पूर्वपदावर आले. मात्र, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाने डोके वर काढल्यामुळे पुन्हा लाट येणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमधील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याचे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे.

सिंगापूरमध्ये अलर्ट

सिंगापूरमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. कोविड रुग्णांची संख्या गेल्या आठवडय़ापेक्षा 28 टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाचा हा प्रकार 2020 च्या लाटेपेक्षा गंभीर आहे. वेगाने विषाणू पसरत असून, लोकांनी लसीचा बुस्टर डोस घ्यावा असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

हाँगकाँगमध्ये विषाणूची गती जास्त

हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या कम्युनिकेबल डिसीज विभागाच्या प्रमुख अल्बर्ट औ यांनी विषाणू पसरण्याची गती जास्त असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. 3 मे रोजीच्या आठवडय़ात कोरोना गंभीर रुग्णांची संख्या 31 वर गेली. त्यात काहींचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरातील ही सर्वात जास्त आकडेवारी आहे.