कुशीनगर एक्सप्रेसमध्ये सापडला मुलाचा मृतदेह, लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये खळबळ

लोकमान्य टिळक टर्मिनसमधील फलाट क्रमांक 4 वर पुशीनगर एक्स्प्रेस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. थ्री टायर एसी बी 2 कोचमधल्या शौचालयातील कचरापेटीत तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढला असता मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला. मुलाच्या 25 वर्षीय चुलत भावानेच हे कांड केल्याचे समोर आले आहे.

नेहमीप्रमाणे पुशीनगर एक्प्रेस मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एलटीटीच्या फलाट क्रमांक 4 वर आली. गाडीत साफसफाई करत असताना कर्मचाऱयाला थ्री टायर एसी बी 2 कोचमधल्या शौचालयातील कचरापेटीत उलटय़ा अवस्थेत टापून ठेवलेला लहान मुलाचा मृतदेह सापडला. ही बाब तत्काळ रेल्वे पोलिसांना सांगण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता मुलाचा गळा चिरलेला आढळून आला. दरम्यान, तो तीन वर्षांचा मुलगा असून 22 तारखेला मुलाच्या आईने सुरत ग्रामीणच्या अमरोली पोलीस ठाण्यात चुलत भावाविरुद्ध आपल्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार आमरोली पोलिसांत विकास शाह (25) या मृत मुलाच्या चुलत भावाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विकास मुलाला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेल पोलिसांकडे असल्याचे समजते. त्याआधारे आमरोली पोलीस आरोपीच्या भाग काढत येत होते. पण मुलाला ठार मारून मृतदेह कचरापेटीत टापून आरोपी पसार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी सापडल्यानंतरच त्याने हे कृत्य का केले ते समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात येते.