पावसात राहते घर कोसळले; शिवसेनेने दिला हक्काचा निवारा

पावसामुळे कांजूर विभागात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचे राहते घर कोसळले. आपला संसार आता कुठे घेऊन जायचा, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र शिवसेनेमुळे या दाम्पत्याला आता हक्काचा निवारा मिळाला असून त्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

कांजूर विभागातील शास्त्री नगर येथील थिटे निवास चाळ येथील रहिवासी सुधीर कांबळी हे पावसाळ्यात गुडघाभर पाण्यामध्ये आपल्या वृद्ध पत्नीसोबत राहत होते. पावसामुळे त्यांचे राहते घर कोसळले. स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कांबळी कुटुंबीयांना आधार दिला. तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब तुमच्या घराची पुनर्बांधणी करून देतो असे आश्वासन दिले. कांबळी कुटुंबीयांना दिलेले वचन पाळत आमदार सुनील राऊत यांनी स्वखर्चाने त्यांचे राहते घर पूर्णपणे सुसज्ज स्थितीत बांधून दिले. त्यामुळे कांबळी कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याबद्दल त्यांनी सुनील राऊत यांचे आभार मानले. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे बाबा कदम, मामी मंचेकर, अनंत पाताडे, रवी महाडिक, भास्कर परब, सचिन मोरे, दीपाली पाटील, विलास मोरे, सुधाकर पेडणेकर, श्वेता पावसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.