भाईंदरमध्ये दुबार मतदारांची घरोघरी जाऊन झाडाझडती; प्रशासन हमीपत्र लिहून घेणार

मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत तब्बल ४० हजार दुबार मतदार आढळले आहेत. पालिका प्रशासनानेच याबाबत माहिती दिली असून आता घरोघरी जाऊन दुबार मतदारांची झाडाझडती घेण्यास सुरवात केली आहे. या सर्व मतदारांकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. दरम्यान, ७४० हरकती आणि सूचनांची पडताळणी करून १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून अलीकडेच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादीही जाहीर करण्यात आली होती. या यादीवर हरकती व सूचना नोंदवण्याची प्रक्रिया ३ डिसेंबरपर्यंत पार पडली. त्यानंतरच्या सुधारणा करून अंतिम मतदार यादी १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. दरम्यान, मतदार यादीतील दुबार नावांबाबत काँग्रेस नेते मुजफ्फर हुसैन यांच्यासह विरोधकांनी आवाज उठवत आक्षेप नोंदवले आहेत. या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दुबार मतदारांची यादी तपासून ती पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या यादीतील मतदारांनी आपला पत्ता आणि ओळखपत्र क्रमांक पडताळून त्यातील एक नाव रद्द करून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.