
दादर येथील स्मशानभूमीमध्ये मानवी हाडे, कवट्यांचा खच पडलेला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहांवर अंत्यविधी करताना व्यवस्थापनाकडून होणारा अक्षम्य हलगर्जीपणा आणि दफनभूमीत मृतदेह दफन करताना आधीच्या मृतदेहांचे काही अवशेष शिल्लक राहत असल्याने हा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. मात्र यामुळे स्मशानभूमीत अंत्यविधीला येणाऱया नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दादर पश्चिम येथील चैत्यभूमीजवळच ही स्मशानभूमी आहे. मध्यवर्ती ठिकाण आणि जवळच समुद्रकिनारा असल्याने या ठिकाणी अंत्यसंस्कार करणे सोयीस्कर ठरते. या ठिकाणी मृतदेहांवरील अंत्यविधीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय दाहिन्यांच्या दुसऱया बाजूला दफनभूमीदेखील आहे. या ठिकाणी मृत्यू झालेल्या एका लहान मुलाला दफन करण्यासाठी गेले असताना हा प्रकार शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या निदर्शनास आला. त्यांनी हा गंभीर प्रकार आपल्या कॅमेऱ्यात टिपला. त्यामुळे पालिकेच्या स्मशानभूमी व्यवस्थापनाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा भंडापह्ड झाला आहे.
नगरविकास विभागाने अहवाल मागवला
दरम्यान, दादर स्मशानभूमीमधील मानवी हाडे, कवट्या उघडय़ावर पडल्याच्या प्रकाराची राज्याच्या नगरविकास विभागाने दखल घेतली असून पालिकेकडे या प्रकरणाबाबत अहवाल मागवला आहे.
आरोग्य विभागाचे तोंडावर बोट
दादरच्या स्मशानभूमीमधील गंभीर प्रकाराबद्दल प्रसारमाध्यमांकडून गंभीर दखल घेतली जात असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही प्रतिकिया देण्यात आली नाही. शिवाय पालिका प्रशासनानेदेखील कोणतीही प्रतिकिया दिली नाही. पालिका प्रशासनाच्या या पावित्र्यामुळे मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.