
सायंकाळनंतर थंडी, दिवसभर उकाडा, ढगाळ वातावरणाने दमट हवामान आणि प्रदूषणामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. यातच पेंद्रीय हवामान खात्याने उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. या हवामानामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईसह राज्यभरात गेल्या दीड महिन्यापासून जोरदार थंडी पडत असल्याने आल्हाददायक वातावरण आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कधी थंडी तर कधी उकाडा जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे ही स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईत किमान तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात असून कमाला तापमान थेट 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत नोंद होत असल्याने घामाच्या धारा निघत आहेत. पुढील काही दिवस असेच वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे.
उत्तर हिंदुस्थानात शाळांना सुट्टी
केंद्रीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट कायम राहणार आहे. यामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे शाळा–महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर हिंदुस्थानात काही ठिकाणी बर्फ पडत असताना दक्षिण हिंदुस्थानच्या काही भागात मात्र उकाडा वाढत आहे.
एक्यूआय 280 वर
मुंबईत आज सकाळी हवेची गुणवत्ता म्हणजे ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ 280 इतका नोंदवला गेला. हे प्रमाण ‘खराब’ श्रेणीत येत असल्याने प्रदूषणाची स्थिती गंभीर बनली आहे. यातच सकाळपासून दाट धुरक्यामुळे दृष्यमानता कमी झाली असून प्रदूषणात भर पडत आहे. सध्या राज्याच्या विविध भागांत अशीच स्थिती आहे.
महाराष्ट्राला यलो अलर्ट
महाराष्ट्राच्या काही जिह्यांमध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पेंद्रीय हवामान खात्याने महाराष्ट्राला खबरदारीचा यलो अलर्ट दिला आहे.































































