
खाडीचे पाणी शेतात घुसल्याने अलिबागच्या माणकुले, सोनकोठा, बहिरीचा या गावांमधील शेकडो एकर जमीन ‘खारट’ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून यंदाच्या पावसाळ्यात तर खाडीचे पाणी घरातही शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. खारभूमी विकास योजनेच्या अनागोंदी कारभारामुळे खारबंदिस्तीची कामे अर्धवट झाली आहेत. खारबंदिस्तीच्या कामाचा खर्च ९ कोटी ६५ लाख रुपयांवरून २२ कोटी ७० लाखांवर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भूमिपुत्रांवर उपासमारीची वेळ
खारबंदिस्तीची दुरवस्था झाल्याने खाडीचे खारेपाणी शेतात घुसून शेत जमीनच नापीक झाली आहे. त्यामुळे भूमिपुत्र शेतकरी चिंतेत सापडला आहे. माणकुले, सोनकोठा व बहिरीच्या पाड्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असून त्यांच्या उपजीविकेचे साधनच नष्ट झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात मोठे उधाण आले तर घरांमध्ये पाणी शिरून संपूर्ण साहित्य व अन्नधान्य याचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
माणकुले, सोनकोठा, हाशिवरे खारबंदिस्तीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. खाडीचे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसू नये म्हणून खारभूमी विकास विभागाच्या वतीने नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ८.६ किलोमीटरचा बंधारा तसेच पाच उघडी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामाचा ठेका २० फेब्रुवारी रोजी दिला. २४ महिन्यांत काम पूर्ण करणे अपेक्षित खारबंदिस्तीचे काम अपूर्ण राहिले. त्यामुळे आर्थिक गणितही वाढले. ९ कोटींचा खर्च तब्बल २२ कोटींवर गेला. आता त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
संबंधित ठेकेदाराने केवळ साडेतीन किलोमीटर बंधाऱ्याचे काम पूर्ण केले आहे. तसेच अंदाजे २.१ किलोमीटर पिचिंग व कवच बंधाऱ्याचे काम झाले आहे. या कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराला ७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. माणकुले, सोनकोठा, हाशिवरे, खारबंदिस्तीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार खारेपाट शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. २० सप्टेंबर २०२२ रोजी या कामाची पाहणीदेखील करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये भराव करताना मुरुम न वापरता बांधाच्या बाजूचीच माती वापरल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यामुळे हे काम निकृष्ट झाल्याचा अहवाल अलिबागच्या तहसीलदारांना देण्यात आला आहे.