गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या!  विविध मागण्यांसाठी म्हाडावर धडक

गिरणी कामगारांचे मुंबईतच पुनर्वसन करावे, गिरण्यांच्या जागेवर बांधलेली संक्रमण शिबिराची घरे गिरणी कामगारांना देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी शेकडो गिरणी कामगार आणि त्यांचे वारस गुरुवारी दुपारी म्हाडा मुख्यालयावर धडकले.

गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने उपमुख्य अधिकारी योगेश महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 15 मार्चचा जीआर काढून राज्य सरकारने गिरणी कामगारांना मुंबईबाहेर हाकलण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे 15 मार्चचा जीआर रद्द करावा, गिरण्यांच्या जागेवर ज्या आयटी पंपन्या उभ्या राहिल्या तिथे गिरणी कामगारांच्या वारसांना नोकरी द्यावी, ज्या कामगार किंवा वारसांनी घरासाठी फॉर्म भरले नाहीत त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची संधी द्यावी, 1981 साली सहा गिरण्यांचे कामगार बोनसमुळे संपावर गेले होते त्यांना या योजनेत समाविष्ट करावे, कोनमधील घराची दुरुस्ती करून तीन वर्षांचा मेंटेनन्स माफ करावा, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

घरांसाठी 1 लाख 75 हजारांहून अधिक गिरणी कामगारांनी अर्ज केले आहेत. त्यातील फक्त 16 हजार गिरणी कामगारांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. काही दिवसांत गिरणी कामगारांची घरासाठी पात्रता निश्चिती पूर्ण होईल पण गिरणी कामगारांना घरे कुठे मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

आनंद मोरे, अध्यक्ष, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती