आधीच शेकडो जागा रिक्त, नवी महाविद्यालये हवीत कशाला? नव्या कॉलेजमुळे सध्याच्या कॉलेजचे अस्तित्व धोक्यात, विद्यापीठाच्या अधिसभेत युवासेना आक्रमक

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांची संख्या 910 वर पोहोचली असताना रविवारी मंजूर करण्यात आलेल्या बृहत् आराखडय़ानुसार आणखी 13 कौशल्यावर आणि 2 पारंपरिक अशा एकूण 15 नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली. मात्र आधीच विद्यापीठाअंतर्गत कौशल्य महाविद्यालयांमध्ये शेकडो जागा रिक्त असताना नव्या महाविद्यालयांना दिलेल्या मंजुरीमुळे  सध्या अस्तित्वात असलेल्या कॉलेजचे अस्तित्व धोक्यात येणार आहेत. त्यामुळे नव्या कॉलेज युवासेनेने विरोध केला असून, आधी नेमकी कोणते अभ्यासक्रम शिकवणार आणि विद्यार्थ्यांना नोकरीची संधी कशी मिळणार, असा सवालही युवासेनेने केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सभेमध्ये बृहत् आराखडय़ाला मंजुरी देण्यात आल्यामुळे नवी कॉलेज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये दक्षिण मुंबईत एक आणि दादर, मुलुंड, कांदिवली, मालाड अशा पाच बिंदूमध्ये मुंबईमध्ये कॉलेज सुरू होतील; पण ही कॉलेज नक्की कुठे सुरू होणार याचा उलगडा विद्यापीठ प्रशासनाकडून केला नसल्याचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. ही नवी महाविद्यालये कीर्तीसारख्या महाविद्यालयांमध्ये सुरू केल्यास संबंधित कॉलेजच्या विद्यार्थी संख्येवर परिणाम होणार आहे. तळकोकणातही आधीच जागा शिल्लक राहत असल्यामुळे आणखी कॉलेज सुरू करून विद्यापीठ प्रशासन नक्की कुणाचे भले करू पाहत आहे, असा सवालही प्रदीप सावंत यांनी केला आहे. ही कॉलेज धनदांडग्यांच्या हाती गेल्यास मूळ महाविद्यालयाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचेही ते म्हणाले.

900 जागा वाढणार, रिझल्टही रखडणार

नव्या महाविद्यालयांमुळे विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी सुमारे 900 जागा वाढणार आहेत. मात्र आधीच विद्यापीठाच्या जागा शिल्लक राहत असल्यामुळे केवळ जागा वाढवून फायदा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात रिक्त जागा नसल्यामुळे आधीच निकाल रखडत आहेत.

अमाप विधी महाविद्यालयांना दिलेल्या मंजुरीतून हा प्रश्न समोर आला आहे. रिक्त जागांमुळे निकाल वेळेत लागत नसल्याचे लेखी उत्तर विद्यापीठाने सरकारला दिले आहे. यातच विद्यापीठाने आता नव्या महाविद्यालयांना दिलेल्या मंजुरीमुळे निकाल आणखी रखडण्याचा धोका आहे.