
संसारात होणारे वाद, भांडण सामान्य बाब असून याकारणावरुन जोडीदाराला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे ठोस कारण मानले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेविरुद्धचा एफआयआर रद्द केला,
अमरावती येथील 49 वर्षीय शिक्षिकेविरुद्ध 2019 मध्ये पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी तक्रार केली होती की, सून त्यांना व पतीला त्रास देत आहे, मारहाण करत आहे, तसेच खोटय़ा गुह्यात अडकवण्याची धमकीदेखील देत आहे, हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करत शिक्षिकेने याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आरोपीने संबंधित व्यक्तीला आत्महत्येसाठी थेट चिथावणी किंवा प्रोत्साहन दिलेले असणे आवश्यक आहे, जोपर्यंत आरोपीचा स्पष्ट गुन्हेगारी हेतू सिद्ध होत नाही, संतापाच्या भरात जोडीदाराने उच्चारलेले शब्द, घरातील रोजचे वाद हे आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुह्यासाठी पुरेसे नाही. या प्रकरणात पती आणि पत्नी दोघांनीही एकमेकांवर छळाचे आरोप केले होते, जे वैवाहिक जीवनात सामान्य मानले जाऊ शकतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सुसाईड नोटमधील मजकूर
न्यायालयाने गुन्हा रद्द करताना सुसाईड नोटची गंभीर दखल घेतली. याप्रकरणात पतीने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, त्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही तसेच पत्नीने चिथावणी दिली, असा उल्लेख त्यात करण्यात आला नसल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

























































