
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 मराठी भाषिक गावांसह जोपर्यंत संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. तसेच सीमाप्रश्नी हौतात्म्य पत्करलेल्या 67 शिवसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा निर्धार आज शिवसैनिकांसह तमाम मराठी भाषक सीमाबांधवांनी केला. सीमाभागात ठिकठिकाणी शिवसेना आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में…’ तसेच ‘शिवसेना झिंदाबाद’ यांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार करण्यात आला.
सीमालढय़ास बासष्ट वर्षे झाली. कानडी अत्याचार सहन करत मराठी भाषक सीमावासीय महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. या सीमालढय़ात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तुरुंगवास भोगला. ते नेहमीच मराठी भाषकांच्या पाठीशी ठाम आणि खंबीरपणे उभे राहिले. 8 फेब्रुवारी 1969 रोजी सीमालढा आंदोलनात 67 शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे दरवर्षी 8 फेब्रुवारी रोजी सीमाभागात या 67 शिवसैनिकांना अभिवादन करून त्यांचे स्मरण करण्यात येते. आजही बेळगाव शिवसेनेच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक चौक येथे कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर, शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, अरविंद नांगनुरे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. कोनवाळ गल्ली येथेही महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच सिंहगर्जना युवक मंडळाच्या वतीने हुतात्मा शिवसैनिकांना अभिवादन करण्यात आले.



























































