
सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर एका प्रवासी बसला आग लागली. मदिनापासून 160 किमी अंतरावरील मुहरासजवळ असताना डिझेल टँकर बसला धडकला. ही धडक इतकी भयंकर होती की, त्यानंतर स्फोट झाला आणि काही क्षणांतच बस जळून खाक झाली. या अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी आणि चालक या अपघातातून बचावले.
मोहम्मद अब्दुल शोएब (वय – 24) असे या अपघातातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. बस रस्त्याच्या कडेला उभी असताना बसमधील सर्व प्रवासी झोपी गेले होते. शोएबही झोपण्याचा प्रयत्न करत होता. मात्र झोप येत नव्हती म्हणून तो सीटवरून उठून चालकाच्या शेजारी जाऊन बसला आणि त्याच्याशी गप्पा मारू लागला. याचवेळी डिझेलने भरलेला टँकर बसला पाठीमागून धडकला. बस आगीत भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी शोएब आणि बस चालकाने खिडक्यांमधून बाहेर उडी घेतली. इतर प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने आगीच होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, हिंदुस्थानी वेळेनुसार रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात शोएब जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने पहाटे साडे पाचच्या सुमारास नातेवाईक तहसीन यांना फोन करून सदर अपघाताची माहिती दिली आणि आपण यातून कसे वाचलो हे देखील सांगितले.
शोएबचा पहाटे 5.30 वाजता कॉल आला होता. बस अपघातातून आपण बचावल्याचे त्याने सांगितले, मात्र इतर सर्व प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले. त्यानंतर आमचा त्याच्याशी संपर्क झालेला नाही. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली, असे शोएबचा नातेवाईक मोहम्मद तहसीन याने सांगितले.





























































