डॉक्टरवर बलात्कार करून जाळणाऱ्यांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा

14577

हैदराबादमध्ये डॉक्टरवर बलात्कार करून तिला अत्यंत निर्घृणपणे जाळून ठार मारण्यात आलं होतं. ( Disha Case ) 28 नोव्हेंबरला झालेल्या या गुन्ह्या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटरमध्ये ( Encounter ) खात्मा करण्यात आला आहे.

या चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी घटनेचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी नेले होते. यावेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केलं होतं. मात्र तरीही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलिसांना अखेर शस्त्र उचलावे लागले. पोलिसांनी चारही जणांना एन्काऊन्टरमध्ये ठार मारले आहे.

चार नराधमांनी या बलात्कार प्रकरणाचा कट रचला होता. पशुवैद्यकीय महिला डॉक्टरची स्कुटी त्यांनी पंक्चर केली होती. त्यानंतर मदतीच्या बहाण्याने या नराधमांनी तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिची हत्या केली आणि मृतदेह जाळून टाकला. मानवतेला काळिमा फासणार्‍या या घृणास्पद कृत्यानंतर संपूर्ण देश पेटून उठला. संतापाची एकच लाट पसरली.

पोलिसांच्या भूमिकेवर उभे केले होते प्रश्नचिन्ह

या घटनेप्रकरणी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी बलात्कारपीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी कुटुंबीयांमध्येही पोलिसांविरोधात संताप असल्याचे शर्मा यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारपीडितेच्या कुटुंबीयांची तक्रार नोंदवून घेतली नाही. तक्रार नोंदवून घेताना हद्दीचेही कारण सांगितले. त्यामुळेच तिचा नाहक बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता

28 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी हैदराबादमध्ये एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या तपासामध्ये हा मृतदेह पशूवैद्यकीय डॉक्टरचा असल्याचे समोर आले होते. सामूहिक बलात्कार करून पुरावा नष्ट करण्यासाठी नराधमांनी तिला जाळून मारल्याचे समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी देशभरातून सुरू झाली.

तेलंगणा पोलिसांनी 29 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या तीन पोलिसांना देखील शनिवारी निलंबित करण्यात आले होते. रविवारी सायराबाद पोलिसांनी रिमांड रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टमध्ये पोलिसांनी त्या रात्री (27-28 नोव्हेंबर) नक्की काय घडले याबाबत माहिती दिली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीने 10 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. 2012 ते 2015 या दरम्यान तो कुकाटपल्ली (Kukatpally) भागात रिक्षा ड्रायव्हरचे काम करत होता. यानंतर 2017 पासून त्याने लॉरी (ट्रक) ड्रायव्हरचे काम सुरू केले.

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं?

बुधवार – 27 नोव्हेंबर

 • सायंकाळी 5.30 वाजता – मुख्य आरोपी आणि लॉरी ड्रायव्हरने दारूच्या काही बाटल्या खरेदी केल्या.
 • चौघे आरोपी शमशबाद (Shamshabad) टोल प्लाझाजवळ लॉरीच्या केबिनमध्ये दारू पित बसले होते.
 • सायंकाळी 6.00 वाजता – एक तरुणी आपल्या लॉरीसमोर स्कुटी लावून क्लिनिककडे गेल्याचे आरोपींनी हेरले.
 • एका आरोपीने तरुणीच्या स्कुटीचे टायर पंक्चर केले आणि चौघांनी तिचा गैरफायदा घेण्याचे ठरवले.
 • रात्री 9.00 वाजता – सगळ्या आरोपींनी आपली लॉरी घटनास्थळापासून 5 किलोमीटर दूर थोंडापल्ली जंक्शनजवळ (Thondapalli Junction) पार्क केली.
 • रात्री 9.18 वाजता – क्लिनिकमधील काम संपवून आल्यानंतर पीडितेला आपल्या स्कुटीचे एक टायर पंक्चर झाल्याचे दिसले.
 • रात्री 9.30 वाजता – तरुणी मदत शोधत असताना एका आरोपीने तिला मदतीचे आमिष दाखवले.
 • या दरम्यान तरुणीने आपल्या बहिणीला फोन करून स्कुटी पंक्चर झाल्याचे आणि भीती वाटत असल्याचे सांगितले.
 • या परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपींनी तिला उचलले आणि ट्रकच्या मागच्या बाजूला असणाऱ्या कंपाऊंडमध्ये नेले.
 • मुख्य आरोपी नवीन याने तिचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि तिला जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न केला.
 • यानंतर चारही आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.
 • पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपींनी तिची हत्या करण्याचे ठऱवले.
 • मुख्य आरोपीने पीडितेचे तोंड आणि नाक दाबून हत्या केली.
 • एका आरोपीने तिचा फोन, घड्याळ आणि पॉवर बँक काढून घेतली.
 • यानंतर आरोपींनी पीडितेचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि पीडितेची स्कुटी घटनास्थळापासून लांब नेऊन ठेवली.
 • या दरम्यान एका आरोपीने एका बाटलीमध्ये पेट्रोल खरेदी केले.
 • आरोपींनी नॅशनल हायवे 44 जवळील सब वेमध्ये पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आपली प्रतिक्रिया द्या