विमानतळावरून हायड्रोपोनिक गांजा जप्त

सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून साडेबारा कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. गांजाची तस्करी करणाऱया प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी कौलालापूरहून एक प्रवासी विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. तो विमानतळावरून घाईघाईत बाहेर जात होता. हा प्रकार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱयाच्या लक्षात आला. त्यानंतर त्या प्रवाशाला थांबवले. त्याच्या बॅगेची तपासणी केली.

त्या बॅगेत 12 किलो 260 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 12 कोटी 26 लाख रुपये इतकी आहे. गांजा तस्करीप्रकरणी त्या प्रवाशाविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.