
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड माध्यमांसमोर फारसे आले नव्हते. परंतु माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते त्यांचे स्वागत करणाऱ्या व्यक्तीला म्हणत आहेत की, दाढी असलेल्या लोकांना पाहूनच भीती वाटते. हे ऐकताच त्यांच्या आजूबाजूचे लोक हसायला लागतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील हा व्हिडीओ असून, त्यात ते विनोदाने म्हणतात की, “मी दाढी असलेल्या एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा मला भीती वाटते. माझे ओएसडी देखील मला त्याच्या दाढीने घाबरवतात.” धनखड हे शब्द त्यांचे स्वागत करणाऱ्या व्यक्तीला म्हणाले. त्या माणसाला दाढी होती, ज्यावर धनखड हसले आणि म्हणाले, “आजकाल, मला फक्त दाढी असलेल्या लोकांना पाहूनच भीती वाटते.” माजी उपराष्ट्रपतींचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदार राहुल कासवान यांच्या सादुलपूर येथील निवासस्थानी भेट दिली. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये जगदीप धनखड यांनी आजारपणामुळे राजीनामा दिला नसल्याचे देखील सांगितले आहे. ते म्हणाले, “मी कधीही माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही. जेव्हा मी राजीनामा देत असल्याचे म्हटले तेव्हा मी कधीही आजारी असल्याचे म्हटले नाही. मी माझ्या आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे म्हटले होते.”
गेल्या वर्षी जुलैमध्ये जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींना लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आरोग्याची कारणे सांगितली होती. २१ जुलै २०२५ रोजी जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सादर केला. धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात व्यापक चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आणि हा विषय वादग्रस्त असल्याचा दावा केला होता.




























































