दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन; उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अशी पहिली प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. X वर एक पोस्ट करत त्या असं म्हणाल्या आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झालं होतं. यातच आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली.

X वर पोस्ट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत की, “आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.”

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन.”

त्या पुढे म्हणाल्या की, “या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.”