राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांची मुलगी लिपी रस्तोगी हिने (27) आज पहाटे मंत्रालयाच्या समोरील सुनीती इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सनदी अधिकारी विकास रस्तोगी आणि त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगीही सनदी अधिकारी आहेत. राधिका रस्तोगी या सामान्य प्रशासन विभागात सचिवपदावर आहेत. मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीमध्ये सनदी अधिकारी, मंत्री, न्यायमूर्ती असे ‘हायप्रोफाईल’ लोक राहतात. रस्तोगी दाम्पत्याची मुलगी लिपी रस्तोगी एलएलबीचे शिक्षण घेत होती. पहाटे तीनच्या सुमारास लिपी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर गेली आणि तिने खाली उडी मारली. इमारतीच्या तळमजल्यावर पार्क केलेल्या दुचाकीवर ती कोसळली. तिला तातडीने जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण लिपीचा जागीच मृत्यू झाला होता. तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण शोधण्यासाठी कफ परेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल
लिपी रस्तोगी ही हरयाणामधील सोनपतमध्ये एलएलबीचे शिक्षण घेत होती. अभ्यासात गती नसल्याने ती मानसिक तणावाखाली आणि नैराश्येत होती. परीक्षा न देताच काही दिवसांपूर्वी हरयाणाहून ती मुंबईला निघून आली होती. लिपी तणावाखाली असल्याचे लक्षात येताच तिच्या पालकांनी तिच्यावर मानसोपचारतज्ञांकडून उपचार सुरू केले होते. असे असतानाच तिने अचानक टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिपीने चिठ्ठी लिहून ठेवली असून माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असे त्यात नमूद केले आहे.