
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची शान मानल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) च्या खेळपट्टीवर आयसीसीने थेट बोट ठेवले असून, अॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीनंतर या खेळपट्टीवर ‘असमाधानकारक’ असा ठपका ठेवण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या या कसोटी सामन्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये एमसीजीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयसीसीच्या या अपेक्षित कारवाईमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या या पवित्र खेळपट्टीवर काळा डाग पडला आहे.
आयसीसीच्या पिच आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेनुसार एमसीजीला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला असून एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनलचे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी हा निर्णय जाहीर केला. ही खेळपट्टी पूर्णतः गोलंदाजांच्या बाजूने झुकलेली होती. पहिल्या दिवशी 20 तर दुसऱ्या दिवशी 16 विकेट्स पडल्या. संपूर्ण सामन्यात एकही अर्धशतक झाले नाही. मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही खेळपट्टी असमाधानकारक ठरते, असे क्रो यांनी स्पष्टपणे सांगितले.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला उतरवले आणि वेगवान माऱ्याने कांगारूंना अक्षरशः गुडघ्यावर आणले. जोश टंगने 45 धावांत 5 विकेट अशी भेदक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 152 धावांत संपवला, मात्र ही खेळपट्टी इंग्लंडलाही तितकीच क्रूर ठरली आणि पाहुण्या संघाचा डाव 30 षटकांत 110 धावांत आटोपला.
पहिल्याच दिवशी तब्बल 20 विकेट्स कोसळल्या. दुसऱ्या दिवशीही फलंदाजांसाठी परिस्थिती बदलली नाही. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 132 धावा केल्या, ज्यात ट्रव्हिस हेडच्या 46 धावा हीच सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लंडने हे लक्ष्य 32.2 षटकांत सहा विकेट्स गमावत गाठले.
या विजयामुळे इंग्लंडला 2011 नंतर ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी विजय मिळाला असला तरी ऑस्ट्रेलियाने आधीच अॅशेस मालिका 3-0 अशी जिंकून राखून ठेवली आहे. मात्र या सामन्यानंतर एमसीजीच्या खेळपट्टीवर बसलेला आयसीसीचा शिक्का ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी निश्चितच नामुष्कीचा ठपका मानला जात आहे.






























































