स्वप्नातही विचार केला नसेल असा पराभव झाला, 50 षटकांचा सामना 5 चेंडूत संपला

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून साऱ्या जगात प्रचलित आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने सुरू असतात. त्यामुळे कुठे ना कुठे काही तरी हटके घटना क्रिकेट जगतात घडत असतात. काही अशा घटना असतात ज्यांचा कधी कोणी स्वप्नातही विचार केला नसावा. असंच झालंय अर्जेंटिनाच्या 19 वर्षांखालील संघाच.

ICC Men’s U19 Cricket World Cup 2026 Americas Qualifier मध्ये कॅनडा आणि अर्जेंटिनाचे संघ आमने सामने आले होते. 10 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 50 षटकांच्या या सामन्यात कॅनडा समोर धावांचा डोंगर उभा करण्याची त्यांना संधी होती. परंतु कॅनडाच्या गोलंदाजांनी अर्जेटिंनाची अक्षरश: भंबेरी उडवली. हजेरी लावून फलंदाज माघारी परतत होते. सात खेळाडूंना तर भोपळाही फोडता आला नाही. अर्जेंटिनाने 19.4 षटकांमध्ये फक्त 23 धावा केल्या. त्यामुळे कॅनडाला जिंकण्यासाठी 50 षटकांमध्ये फक्त 24 धावांची गरज होती. कॅनडाने हे छोटंस आव्हान फक्त 5 चेंडूंमध्ये पूर्ण केलं आणि राजेशाही थाटात सामना जिंकला. सलामीला आलेल्या युवराज सामराने चार चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 2 षटकार मारले तर धर्म पटेलने एक धाव केली आणि अर्जेंटिनाने यामध्ये अतिरिक्त तीन धावांची भर घातली.