
हिंदुस्थान–पाकिस्तान या दोन क्रिकेटवेडय़ा देशांमधील मॅच म्हणजे काय? टेन्शन, खुन्नस, थरार, राडा, शाब्दिक खडाजंगी… जिंकलो तर महाजल्लोष अन् हरलो तर शिव्यांची लाखोली… आणि असं बरंच काही… अहो, मग उद्या हा ‘क्रिकेटवॉर’चा थरार, टेन्शन अनुभवण्यासाठी सायंकाळपर्यंत आपापली कामे उरकून सज्ज व्हा… या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना अन् चाहत्यांना एकमेकांविरुद्धचा पराभव पचवायला अवघड असतो, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हिंदुस्थान–पाकिस्तान संघातील फलंदाजांच्या तळपत्या तलवारी आणि गोलंदाजी ताफ्यातील मुलुख मैदानी तोफा उद्या एकमेकांना भिडतील तेव्हा नक्कीच क्रिकेटप्रेमींना एक हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल.
मागील दोन आठवडय़ांत हा सामना होणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. मात्र आयसीसीच्या दृष्टीने या लढतीचा निकाल कितीही गौण असला तरी हा सामना ‘होणं’ हेच सर्वांत महत्त्वाचं ठरतं. कारण हिंदुस्थान-पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीवर केवळ क्रिकेटजगताचं नव्हे, तर अवघ्या क्रीडाविश्वाचं लक्ष असतं. प्रेक्षकांची गर्दी, टीव्हीवरील प्रेक्षकसंख्या आणि भावनिक गुंतवणूक पाहता हा सामना अजूनही क्रिकेटविश्वाचा केंद्रबिंदू आहे. उभय संघांनी ‘अ’ गटातून दोन-दोन सामने जिंकलेले असल्याने उद्याच्या लढतीतील पराभवाचा फारसा परिणाम दोन्ही संघांना जाणवणार नाही. मात्र हिंदुस्थानला पराभूत केले तर मायदेशात आपले स्वागत विजेत्या संघासारखे होईल, हे पाक क्रिकेटपटू पुरते जाणून असल्याने ते उद्या मैदानावर सर्वस्व पणाला लावतील, यात वादच नाही. मात्र, आयसीसी स्पर्धा म्हटले की, हिंदुस्थानचे पारडे नेहमीच जड असते, असा इतिहास आहे. त्यामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली सूर्यकुमार यादवची ‘टीम इंडिया’ याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. उभय संघांची तुलना करायची झाल्यास या घडीला तरी हिंदुस्थानचाच संघ सर्व पातळ्यांवर मजबूत वाटतो. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने हिंदुस्थानने गाफील राहून चालणार नाही. फलंदाजी हे हिंदुस्थानचे प्रमुख क्षेपणास्त्र होय. कर्णधार सूर्यासह ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, रिंकू सिंग असे एकाचढ एक मॅचविनर फलंदाजांची फळी हिंदुस्थानच्या दिमतीला आहेत. दुसरीकडे जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली पंडय़ासह अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती यांना टिच्चून मारा करावा लागणार आहे.
पाकिस्तानची मदार गोलंदाजीवर
पाकिस्तानकडे साहिबजादा फरहान, साईम अयूब, कर्णधार सलमान आघा, बाबर आझम, शादाब खान असे प्रभावी फलंदाज आहेत. मात्र, त्यांची खरी मदार ही गोलंदाजीवर असेल. शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान तारीक व मोहम्मद नवाझ यांच्या मार्याला हिंदुस्थानी फलंदाज कसे सामोरे जातात यावरच सामन्याचे चित्र अवलंबून असेल. फहीम अशरफ व अबरार अहमद जोडगोळीकडूनही पाकिस्तानला चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल.
उभय संभाव्य संघ ः
हिंदुस्थान ः ईशान किशन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान ः साहिबजादा फरहान (यष्टिरक्षक), साईम अयूब, सलमान आघा (कर्णधार), बाबर आझम, शादाब खान, उस्मान खान/फखर झमान, मोहम्मद नवाझ, फहीम अशरफ, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान तारीक, अबरार अहमद.
आकडेवारी
n टी-20 विश्वचषकात हिंदुस्थान आघाडीवर ः 7 विजय, पाकिस्तान 1
n 2024 पासून अभिषेक शर्माचा स्ट्राइक रेट 194.45
n शाहीन शाह आफ्रिदीने 2024 पासून पहिल्या षटकात 15 वेळा विकेट घेतल्या आहेत.
n पंडय़ाचे पाकिस्तानविरुद्ध 8 डावांत 15 विकेट
n मोहम्मद नवाझ 100 टी-20 बळींपासून तीन बळी दूर

























































