बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने बांगलादेशचा सुपडा साफ करत मालिका विजय साजरा केला. टीम इंडियाच्या विजयात सर्व खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. त्याचे फळ त्यांना मिळाले असून ICC ने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह अव्वल गोलंदाज ठरला आहे. तर फलंदाजीमध्ये यशस्वीने तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे.
ICC ने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. तर रविचंद्रन अश्विनची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्याचबरोबर अव्वल 10 गोलदाजांमध्ये रवींद्र जडेजाचा सुद्धा समावेश आहे. आपल्या फलंदाजीने बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या यशस्वी जयस्वालने पाचव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने बाराव्या क्रमांकावरुन सहाव्या क्रमांकावर उडी मारली आहे.
यष्टीरक्षक ऋषभ पंतची मात्र आयसीसी कसोटी क्रमवारीत घसरण झाली असून तो 9 व्या नंबरवर फेकला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल दहा फलंदाजांमध्ये यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि ऋषभ पंत या तीन हिंदुस्थानी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र कर्णधार रोहित शर्माच्या क्रमवारीत जोरदार घसरण झाली असून तो 10 व्या क्रमांकावरून 15 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.