महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा – हिंदुस्थानी महिलांपुढे पुन्हा ऑस्ट्रेलियाचे आव्हान

महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून, उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झाले आहेत. त्यातच आज ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा ७ गडी राखून पराभव केल्यानंतर उपांत्य फेरीत कोणता संघ कोणाशी झुंजणार, याचेही चित्र स्पष्ट झाले आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत हिंदुस्थानपुढे ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असणार आहे.

आज इंदूरच्या मैदानावर रंगलेल्या ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यातील सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अलाना किंग हिने तिच्या फिरकीवर आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवले. किंगने ७ षटकांत अवघ्या १८ धावा देत आफ्रिकेचे ७ गडी बाद करत फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यामुळे आफ्रिकेचा डाव अवघ्या ९७ धावांवरच गडगडला.

या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावले; पण शेवटी १६ व्या षटकात विजयी डाव साधत अपराजित राहून गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने अव्वलस्थान कायम राखले. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाकडून जॉर्जिया वोल हिने ३८ चेंडूंत नाबाद ३८ धावांची खेळी केली. याशिवाय बेथ मूनी हिने ४१ चेंडूंत ४२ धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या संघाला अक्षरशः लोळवून विजय मिळवला. अव्वल स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर विश्वचषक पटकवायचा असेल तर हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाचे वादळ रोखावे लागणार आहे. ३० ऑक्टोबरला नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. तर, इंग्लंड आणि आफ्रिका यांच्यात २९ ऑक्टोबरला पहिला उपांत्य सामना रंगणार आहे.