हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात; पाकिस्तानचा खुर्दा उडवत न्यूझीलंड उपांत्य फेरीत

शेवटी जी भीती होती तेचं घडलं. यूएईमध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील हिंदुस्थानचे आव्हान गट फेरीतच संपुष्टात आलं. न्यूझीलंडने 110 धावांचा बचाव करताना पाकिस्तानचा अवघ्या 56 धावांतच खुर्दा पाडला. या विजयासह न्यूझीलंड ‘अ’ गटातून उपांत्य फेरी गाठणारा दुसरा संघ ठरला. न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तानसह हिंदुस्थानचेही आव्हान संपले. ऑस्ट्रेलियाने विजयाच्या चौकारासह सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठली होती. मात्र ब गटातून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने तीन विजयांसह सहा गुण मिळवले असले तरी मंगळवारी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील लढतीनंतरच उपांत्य फेरीतील दोन्ही संघ ठरतील.

हिंदुस्थानी महिलांना वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. हाच दारुण पराभव हिंदुस्थानचे आव्हान संपण्यासाठी खऱया अर्थाने कारणीभूत ठरला. हिंदुस्थानी महिलांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवत स्पर्धेत पुनरागमन केलं होतं. मात्र, रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत पराभव झाल्याने हिंदुस्थानी संघाचं भवितव्य पाकिस्तानच्या विजयावर अवलंबून होतं. मात्र पाकिस्तानला मानहानीकारक पराभव सहन करावा लागला आणि त्यासोबत हिंदुस्थानचे उपांत्य फेरीत पोहचण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 110 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा डाव 11.4 षटकांतच केवळ 56 धावांतच आटोपला.