अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व कायमस्वरूपी पुराचा तोडगा काढण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोवाड, माणगाव, तांबुळवाडी फाटामार्गे चंदगड अशी 35 कि.मी. पायपीट करत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकताच, शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली व विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले.
चंदगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली बिकट अवस्था व पिकांचे नुकसान याबाबत बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, गोपाळराव पाटील, अमर चव्हाण-पाटील, जगन्नाथ हुलजी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. आगामी पावसाळ्यापूर्वी ताम्रपर्णी व घटप्रभा नदीतील गाळ काढावा, अतिक्रमणमुक्त करावे, 31 मार्चपूर्वी कृती आराखडा शासनाने तयार करावा; अन्यथा ताम्रपर्णी नदीकाठावरील 60 गावे नदीपात्रातील पाण्यात उतरून ‘आत्मक्लेश’ आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.
आक्रोश मोर्चात मारुती पाटील, चंद्रशेखर गावडे, ‘दौलत’चे व्हाईस चेअरमन संजय पाटील, अशोक पेडणेकर, संजय तरडेकर यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.