भारतात मुक्त आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार करणाऱ्या पद्धतीवरच हल्ला, राहुल गांधी यांची टीका

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपप्रणीत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “भारतात मुक्त आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या कल्पनेवर प्रचंड हल्ला होत आहे असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे..”चिली विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.

जेव्हा राहुल गांधींना विचारण्यात आले की काँग्रेस पक्ष शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल करू इच्छितो, तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, भारतात सध्या मुक्त विचारांची, खुल्या मनाने विचार करण्याची, वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोन बाळगण्याची कल्पनेवर हल्ले होत आहेत. आणि हेच आम्ही जपण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

राहुल गांधी यांनी भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सर्वांसाठी सुलभ अशा समावेशक शिक्षण प्रणालीची गरज यावरही भर दिला. राहुल गांधी म्हणाले की, शिक्षणाची सुरुवात उत्सुकतेपासून होते, आणि विचार करण्याचे, मुक्तपणे प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक भीतीशिवाय आवश्यक असते. शिक्षण काही मोजक्यांपुरते मर्यादित विशेषाधिकार बनू नये, कारण तेच स्वातंत्र्याचे मूळ आहे. भारताला अशी शिक्षण प्रणाली हवी, जी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवेल, चिकित्सक विचारांना प्रोत्साहन देईल आणि आपल्या देशाच्या समृद्ध विविधतेचे प्रतिबिंब दाखवेल असेही राहुल गांधी म्हणाले.