तीन अपत्ये असल्यास कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. ही माहिती लपवून निवडणूक जिंकली तरी त्या लोकप्रतिनिधीला अपात्र करणारा नियम आहे. हा नियम गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीलाही लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. अविनाश घरोटे यांच्या एकल पीठाने हा निर्वाळा दिला आहे. तीन अपत्ये असलेल्या पश्चिम उपनगरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षाला अपात्र ठरविणाऱया उपनिबंधकाच्या आदेशावर न्या. घरोटे यांनी शिक्कामोर्तब केले.
n महाराष्ट्र को.ऑ.हौ. सोसायटी कायद्यात दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या पदाधिकाऱयाचे पद रद्द करण्याची कोणतीच तरतूद नाही, असा दावा सिंग यांनी केला होता.
n दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास सोसायटी पदाधिकाऱयाला अपात्र करण्याची तरतूद नियमात आहे. नियमानुसारच सिंग यांना अपात्र करण्यात आले आहे. उपनिबंधकांचे आदेश योग्य असल्याचा युक्तिवाद अॅड. डॉ. उदय वारुंजीकर यांनी केला.
काय आहे प्रकरण…
कांदिवली, चारकोपच्या एकता नगर को.ऑ.हौ. सोसायटीचे अध्यक्ष पवनकुमार नंदकिशोर सिंग यांनी ही याचिका केली होती. त्यांच्या अध्यक्षपद निवडीला दीपक तेजल व रामाचल यादव यांनी आव्हान दिले होते. सिंग यांना तीन अपत्ये आहेत. त्यांना अपात्र करावे, अशी मागणी उपनिबंधक (म्हाडा, को.ऑ. हौ. सोसायटी) यांच्याकडे करण्यात आली. उपनिबंधक यांनी सिंग यांना अपात्र केले. त्याविरोधात सिंग यांनी याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
न्यायालयाचे निरीक्षण
तीनपैकी एक अपत्य माझे नाही. तो मुलगा शिक्षण घेण्यासाठी आपल्या घरी राहतो, असे सिंग यांचे म्हणणे होते. त्या मुलाचा जन्म दाखला सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सिंग जन्म दाखला सादर करू शकले नाहीत. रेशन कार्डवर त्या मुलाचे नाव आहे. याचा अर्थ तो मुलगा त्यांचाच आहे. सिंग यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट होत असल्याने उपनिबंधकांच्या आदेशात कोणताच दोष नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.