
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी आणि गोंधळ घालणाऱ्यांना VIP भक्तांवर थेट गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर व पोलीस प्रशासनाला दिले आहेत. दैनिक ‘सामना’ने VIP भाविकांकडून होणाऱ्या दमबाजीविरोधात आवाज उठविला होता. या बातमीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला लेखी आदेश काढले आहेत.
6 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत आहे. या सोहळ्यासाठी विविध राज्यांमधून दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करीत आहेत. पालख्या पंढरीत दाखल होण्यापूर्वीच पंढरी भाविकांच्या गर्दीने फुलली आहे. त्यामुळे देवाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून चार किलोमीटर दूरपर्यंत पोहचली आहे. पद दर्शनासाठी 12 ते 15 तासांचा अवधी, तर मुख दर्शनासाठी 2 ते 4 तासांचा कालावधी लागत आहेत.
दर्शन रांगेतील भाविकांना तत्पर आणि सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर समिती कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, VIP भाविकांमुळे इतर भाविकांना दर्शनासाठी ताटकळत राहवे लागत आहे. आमदार, खासदार, मंत्री, नेते, पदाधिकारी आदींची मोठी गर्दी सध्या पंढरीत वाढली आहे. VIP सह 50 ते 100 लोक दर्शनासाठी घुसखोरी करीत असल्याने दर्शन रांगेतील भाविकांच्या समस्येत भर पडते आहे.
VIP ची दमबाजी आणि शिवीगाळ हे मंदिरच्या गेटवर नित्याचे झाल्याचे दिसत आहे. याबाबत दैनिक सामनाने हा मुद्दा लावून धरला. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी राज्यशासनाच्या 2010 मधील अध्यादेशाचा आधार घेत VIP दर्शन पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी मंदिर व पोलीस प्रशासनाला लेखी आदेश काढले असून शॉर्टकट VIP दर्शन मागणाऱ्या आणि त्यासाठी दमबाजी अथवा शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात थेट गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे पोलीस आणि मंदिर प्रशासनाला काम करताना अधिकचे बळ मिळाले असून दर्शन रांगेतील भाविकांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय सुखकर ठरणार आहे.
कार्यवाहीला पालकमंत्र्यांचा पाठिंबा
VIP दर्शनाबाबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. VIP म्हणून मोजक्या दोन चार व्यक्तींना दर्शनाची व्यवस्था करणे हे समजू शकतो. पण मोठ्या संख्येने लोक घेऊन शॉर्टकट दर्शनाचा कोणी आग्रह करीत असतील तर हे उचित नाही. दर्शन रांगेतील लोक अनेक तास उभे असतात, त्यातील बहुतांश भाविक वयोवृद्ध आहेत. याची जाणिव ठेवून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.
– जयकुमार गोरे, पालकमंत्री सोलापूर



























































