एफआरसीव्ही तीन टप्प्यात अधिग्रहित केली जातील. पहिल्या टप्प्यात 590 एफआरसीव्हीचे वाटप केले जाईल. जुन्या टी-72 रणगाडय़ांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका उपस्थित झाली आहे. हे रणगाडे बदलण्याची गरज अधोरेखित झाली आहे, विशेषतः रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान ही गरज अधोरेखित केली गेली, जिथे हे रणगाडे अकार्यक्षम दिसले.
सैन्यदलातील रशियन बनावटीचे ‘टी-72’ रणगाडे आता निवृत्त होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांची जागा स्वदेशी फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेईकल (एफआरसीव्ही) घेणार आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) एफआरसीव्हीच्या निर्मितीला मंजुरी दिलेय. त्यामुळे टप्प्याटप्प्याने 1770 एफआरसीव्ही लष्कराच्या ताफ्यात येतील. हिंदुस्थानी लष्कराच्या रणगाडा पथकाच्या आधुनिकीकरणासाठी भविष्याच्या दृष्टीने सुसज्ज लढाऊ वाहनांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, एफआरसीव्ही रणगाडे पुढील 35 ते 45 वर्षे सेवेत राहतील, अशा पद्धतीने त्यांची रचना केली जाईल. ते शत्रूंवर जबरदस्त हल्ला करतीलच पण त्यांच्यावर क्षेपणास्त्राच्या हल्ल्याचा परिणाम होणार नाही, इतके ते मजबूत असतील. हे रणगाडे दीर्घकाळ युद्भभूमीत टिकून राहतील. एफआरसीव्हीमध्ये उच्च गतिशीलता क्षमता, सर्व प्रकारच्या प्रदेशात कार्य करण्याची क्षमता, विविध स्तरीय संरक्षक कवच, तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून अचूक आणि घातक मारा करण्याची क्षमता असेल असे डीएसीने म्हटले.