
दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बिबट्याशी सामना झाला. पर्वेश शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. ऐन सकाळी बिबट्याने पर्वेशवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर पर्वेशने धीर सोडला नाही. त्याने या बिबट्याशी दोन हात करण्याचे ठरवले. जवळपास 10 मिनिटे तो बिबट्याशी संघर्ष करत राहिला. बिबट्याचा जबडा दोन्ही हाताने पकडल्याने पर्वेश बचावला. पर्वेशने बिबट्याच्या तावडीत मान जाऊ दिली नाही. अन्यथा बिबट्याने पर्वेशला मोठी दुखापत केली असती. बिबट्याला रोखून धरत, आरडाओरडही सुरूच ठेवली. हाताला येईल ते दगड बिबट्याच्या दिशेने भिरकावले. दगडाचा जोरदार प्रहार झाल्याने यात बिबट्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पर्वेशही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडले. पर्वेशचे धाडसी कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वन विभागानेही त्याचे कौतुक केले असून त्याला 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.




























































