
बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदा केमिकल गोदामे थाटल्याने भिवंडीची काटई स्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांसह खुद सरपंचांनीदेखील आवाज उठवत कारवाईची मागणी केली आहे. मात्र अधिकारी आणि गोदाममालकांचे साटेलोटे असल्याने या केमिकलच्या साठ्यावर कारवाईस चालढकलपणा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल काटई भागातील रहिवाशांनी केला आहे.
भिवंडीतील राहनाळ, पूर्णा, काल्हेर या भागात केमिकल गोदामांना अनेकदा आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने या केमिकल अड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारून दणका दिला होता. मात्र केमिकलमाफियांनी या कारवाईनंतर आपले बस्तान शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीत बसवले आहेत.
या भागात असलेल्या काही बंद कारखान्यांच्या जागांवर शेड मारून शेकडोंच्या संख्येने प्लास्टिक आणि लोखंडी ड्रममध्ये केमिकलचा साठा केला आहे. काटईमध्येही अशाच एका केमिकलच्या गोदामात आग लागून कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या बेकायदा केमिकल गोदामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गाव बेचिराख व्हायला वेळ लागणार नाही
साठवलेले केमिकल इतके ज्वलनशील आहे की वाहतूक तसेच गोदामात हाताळताना अनेकदा कामगारांचे हात होरपळून निघतात. धक्कादायक म्हणजे ही सर्व गोदामे एकमेकांच्या बाजूला असल्याने आगीचा भडका उडाल्यास मोठा स्फोट होऊन संपूर्ण गाव बेचिराख व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तर रस्त्यावर उतरू
काटई ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील बेकायदा गोदामांवर तत्काळ कारवाई करावी यासाठी पोलिसांसह महसूल विभागाकडे मागणी केली आहे. मात्र कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत असून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच छाया पाटील व ग्रामस्थ भावेश पाटील यांनी दिला आहे.