
मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का म्हणून कायरॉन पोलार्डने आपली कारकिर्द गाजवली. त्याच्या आक्रमक फलंदाजीपुढे विरोधी संघातल्या गोलंदाजांची नेहमीच तारांबळ उडायची. आता पुन्हा एकदा त्याने वयाच्या 38 व्या वर्षी आपल्या तडाखेबंद फलंदाजीची झलक दाखवून दिली आहे. ILT20 2025 मध्ये MI एमिरेट्स संघाकडून खेळताना त्याने गोलंदाजांना चोपून काढलं आहे. पोलार्डच्या झुंजार खेळीमुळे MI एमिरेट्सने दुबई कॅपिटल्सचा 8 विकेटने पराभव केला.
दुबई कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करतना MI एमिरेट्स संघाला 123 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना MI ची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेल्या मोहम्मद वसम आणि आंद्रे फ्लेचर यांनी 47 धावांची सलामी दिली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या टॉम बॅंटनने 28 धावांची खेळी केली. त्यानंतर कायरॉन पोलार्डने आपल्या जुन्या अंदाजात फटकेबाजी करत 31 चेंडूंमध्ये 44 धावांची विजयी खेळी केली. यामध्ये एक चौकार आणि 5 खणखणीत षटकरांचा समावेश आहे. या सामन्यात 15 वे षटक निर्णायक ठरले. कारण या षटकात पोलार्डने चौकार आणि षटकारांची बरसात केली. त्याने एकाच षटकात 30 धावा चोपून काढल्या. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर दोन धावा आणि शेवटच्या तीन चेंडूंमध्ये षटकारांची हॅट्रीक मारली.
























































