
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याने, मध्यप्रदेशातील एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतींबाबत उपहासात्मक टिप्पणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी ब्लॉकमधील सेमरखेडी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक साकेत पुरोहित यांनी एलपीजीच्या वाढत्या किमतींवर भाष्य केले. हे भाष्य करताना त्यांनी पंतप्रधानांची नक्कल करत व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ते असे म्हणाले की, गॅसच्या किमती वाढल्यामुळे लोक पुन्हा पारंपरिक चुलीवर बनवलेल्या भाकरी खाण्यास सुरुवात करतील आणि त्यामुळे श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी कमी होईल.
दरम्यान, शिक्षक साकेत पुरोहित यांनी ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली नाही किंवा आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, माझे काहीच ऐकून न घेता कारवाई करणे योग्य नाही.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली. त्यानंतर पिछोरचे भाजप आमदार प्रितम लोधी यांनी लेखी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीत सरकारी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाने पंतप्रधान आणि लोकप्रतिनिधींची नक्कल करून सेवा आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा शिक्षण अधिकारी विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, चौकशीत पुरोहित यांचे कृत्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या वर्तन नियमांच्या विरोधात आढळल्याने त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या काळात त्यांची बदरवास येथील गट शिक्षण कार्यालयात नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता दिला जाईल.


























































