‘केईएम’मधील औषध पुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेनेचा पालिकेला इशारा

मुंबई महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी पालिकेच्या केईएम रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना अपुऱ्या औषधांमुळे नाहक आर्थिक भुर्दंड पडतो. त्यामुळे या रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा शिवसेना केईएम रुग्णालय आणि पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाविरोधात जोरदार आंदोलन करेल, असा इशारा आज शिवसेनेने दिला.

केईएम रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या अपुऱ्या औषध साठय़ाविरोधात आवाज उठवूनही कोणतीही कार्यवाही केली जात नाही. एकीकडे रुग्णालयाचा शतक महोत्सव साजरा करण्यासाठी तब्बल 20 कोटींचा खर्च केला जातो, मात्र या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करून न देता बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जाते. पालिकेच्या या अकार्यक्षमतेविरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांची भेट घेऊन निवेदन दिले. गोरगरीबांसाठी किमान औषधे खरेदी करू न देणारा मध्यवर्ती खरेदी विभाग तरी बंद करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अनिल कोकीळ, सचिन पडवळ, दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख किरण तावडे, जयसिंग भोसले, मिनार नाटळकर, देवा सावंत, कोटकर यांच्यासह शिवसैनिक-पदाधिकारी, डॉ. हरीश पाठक, डॉ. अजय राणा आदी उपस्थित होते.