लूक आऊट नोटीस जारी केलेल्या आरोपीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन विभागात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी सहार पोलिसांनी मोहमद आफ्रिद अशरफ विरोधात गुन्हा नोंद केला. मोहमदवर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोहमद हा मूळचा कर्नाटकचा रहिवाशी आहे. सोमवारी सकाळी तो दुबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या विरोधात कर्नाटक येथील कोडागूच्या पोलीस अधीक्षकांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती. मोहमद विरोधात कर्नाटकच्या सिद्धपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटीचा गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याच्या विरोधात एलओसी जारी केली होती.
सोमवारी मोहमद हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याला इमिग्रेशन अधिकाऱयाने ताब्यात घेऊन सेफ कोठडीत ठेवले. त्याच्या अटकेची माहिती कर्नाटक पोलिसांना दिली. मोहमदला ताब्यात घेण्यासाठी सिद्धपुरा पोलीस ठाण्याचे पथक मुंबईला रवाना झाले. त्याच दरम्यान मोहमदने तीक्ष्ण हत्याराने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. याची माहिती सहार पोलिसांना कळवण्यात आली. जखमी मोहमदला कूपर रुग्णालयात दाखल केले. मोहमदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मोहमदविरोधात गुन्हा नोंद केला आहे.