
आखाती युद्धाचा परिणाम हिंदुस्थानातील मार्केटवर झाला आहे. देशभरात अंडय़ांच्या किमतीत अचानक 30 ते 40 टक्क्यांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी व्यापाऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. बाजारात अंडय़ांची किंमत प्रति अंडे सुमारे 7 रुपयांवरून घसरून 5 रुपयांपर्यंत आली आहे.
युद्धामुळे पोल्ट्री उद्योगासाठी परिस्थिती अस्थिर बनली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे खाडी देशांकडे होणाऱया अंडय़ांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान निर्यात ठप्प झाल्याने मोठय़ा प्रमाणात अंडी देशांतर्गत बाजारात उपलब्ध झाली असून त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.
- 100 अंडी सुमारे 500 रुपयांत उपलब्ध होत आहेत. किरकोळ बाजारातही अंडय़ांच्या दरात घट झाली असून, पूर्वी 8 ते 9 रुपयांना विकले जाणारे अंडे आता 5.50 ते 6 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे.
दिवसाला एक कोटी अंडय़ांची निर्यात
निर्यात घसरणीमागे आखाती देशातील वाढते तणावपूर्ण वातावरण कारणीभूत आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे आणि वाहतूक मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने संयुक्त अरब अमिरात, ओमान, कतार आणि बरीन यांसारख्या देशांशी होणारा व्यापार मोठय़ा प्रमाणात बंद झाला आहे. युद्धाआधी दररोज सुमारे 1 कोटी अंडय़ांची निर्यात केली जात होती. विशेष म्हणजे देशातील एकूण निर्यात योग्य अंडय़ांपैकी जवळपास 80 टक्के अंडी ही केवळ आखाती देशांमध्ये पाठवली जात होती. मात्र सध्या निर्यात थांबल्यामुळे हा मोठा साठा देशांतर्गत बाजारात आणला जात आहे.सामान्य ग्राहकांना दिलासा
या परिस्थितीत व्यापाऱयांना तोटा सहन करावा लागत असला तरी सामान्य ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. किमती कमी झाल्यामुळे अंडय़ांची मागणी पुन्हा वाढू लागली आहे.



























































