इस्रायल-इराण संघर्षाचा फटका – इराणमध्ये हिंदुस्थानी MBBS चे विद्यार्थी चिंतेत, पुण्याचे 84 MBA विद्यार्थी दुबईत अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम आशियात वाढत्या संघर्षामुळे शेकडो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या प्रवास आणि शिक्षणावर गंभीर परिणाम झाला आहे. इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी अनिश्चिततेत अडकले आहेत, तर पुण्यातील 84 MBA चे विद्यार्थी दुबईमध्ये अडकून पडले आहेत. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

इराणमधील केरमान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा आणि श्रीनगरचा रहिवासी फैजान नबी 6 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर मायदेशी परतला. अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्यानंतर त्याने 20 फेब्रुवारी रोजी केरमनहून तेहरानपर्यंत सुमारे 1,000 किमीचा रेल्वे प्रवास केला. 21 फेब्रुवारीला अझरबैजानमार्गे असलेले त्याचे विमान शेवटच्या क्षणी रद्द झाले. अखेर 24 फेब्रुवारीला दुबईमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाने तो परतला. त्या विमानात 50 ते 60 हिंदुस्थानी वैद्यकीय विद्यार्थी होते.

“मी कुटुंबासोबत परत आल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र अजूनही इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाटते,” असे फैजानने सांगितले.

अनिवार्य परीक्षांमुळे विद्यार्थी अडकले
जम्मू-काश्मीर स्टुडंट्स असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक नासिर खुहेमी यांनी सांगितले की, इराणमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना आरोग्य मंत्रालयाकडून घेतल्या जाणाऱ्या 2 अनिवार्य परीक्षा द्याव्या लागतात.

5 सत्रांनंतर ‘ओलूम-ए-पाया’ परीक्षा
8 सत्रांनंतर ‘प्री-इंटर्नशिप’ परीक्षा

या परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास शैक्षणिक प्रगती थांबते. 5 मार्च रोजी होणारी परीक्षा आधी फेब्रुवारीत अपेक्षित होती; मात्र अंतर्गत संघर्षामुळे ती पुढे ढकलण्यात आली. वाढत्या तणावामुळे परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

सध्या इराणमध्ये सुमारे 2,000 हिंदुस्थानी विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास 1,200 विद्यार्थी जम्मू-काश्मीरमधील असून इतर विद्यार्थी उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, राजस्थान आणि दिल्ली येथील आहेत.

परवडणारी शिक्षण फी, शिष्यवृत्तीची संधी आणि बारावीच्या गुणांवर प्रवेश या कारणांमुळे विद्यार्थी इराणची निवड करतात. सांस्कृतिकदृष्ट्याही अनेक विद्यार्थ्यांना तेथे जुळवून घेणे सोपे जाते. 28 फेब्रुवारीपर्यंत 800 ते 1,000 विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत इराणमध्येच थांबले होते.

संपर्कात अडथळे; पंतप्रधानांकडे हस्तक्षेपाची मागणी

इराणमधील काही भागांत इंटरनेट आणि आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा विस्कळीत झाल्याने संपर्क साधणे कठीण झाले आहे. संबंधित संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, शैक्षणिक संरक्षणासाठी आणि आवश्यक असल्यास स्थलांतरासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

फैजानने इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाकडून मिळालेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. “ते दररोज संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेत होते आणि परतीच्या प्रवासासाठी मदत करत होते,” असे त्याने सांगितले.

दुबईत पुण्याचे 84 विद्यार्थी अडकले

दरम्यान, पुण्यातील इंदिरा विद्यापीठ येथील 84 व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अभ्यास दौर्‍यासाठी दुबईला गेले होते. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी नियोजित असलेली त्यांची परतीची विमाने प्रादेशिक हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे रद्द झाली.

विद्यार्थ्यांनी 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दुबई गाठले होते. 4 दिवसांच्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत त्यांनी Middlesex University Dubai येथे भेट दिली आणि त्यानंतर पर्यटन कार्यक्रमात सहभाग घेतला.

विद्यापीठाचे प्रशासकीय संचालक डॉ. शिवेंदू भुसन यांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे सांगितले. “4 प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत आहेत. हॉटेल सुरक्षित ठिकाणी आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि इराणने अमेरिकन तळांवर दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पश्चिम आशियातील मोठ्या भागातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी विमानसेवा विस्कळीत झाली असून विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. काही विद्यार्थी खडतर प्रवासानंतर मायदेशी परतले असले तरी अनेक जण अजूनही परीक्षा, स्थलांतर किंवा विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. “सर्वजण सुरक्षित राहावेत, हीच प्रार्थना,” असे फैजानने शेवटी म्हटले.