देशभरातील महत्वाच्या घडामोडी

झोमॅटोवर दोन दिवस आधीच ऑर्डर करता येणार

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवर ग्राहक आता दोन दिवस अगोदरच ऑर्डर शेड्यूल करू शकतात. कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी एक्सवर पोस्ट करत नव्या सुविधेची घोषणा केली. सध्या ही सुविधा मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चंदिगड, लखनऊ आणि जयपूरमधील सुमारे 13 हजार रेस्टॉरंटमध्ये सुरू झाली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक हजार रुपयांपेक्षा जास्त ऑर्डर करावी लागेल. एप्रिल ते जून तिमाहीत झोमॅटोचा नफा वार्षिक आधारावर 126 पटीने वाढून 253 कोटी रुपये झाला आहे.

एकही रुपया न देता आधार करा अपडेट; 14 सप्टेंबरपर्यंतची मुदत

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. तसेच ही सुविधा मोफत मिळणार असून 14 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बायोमेट्रिक नोंदी अपडेट करणे किंवा फोटो बदलण्यासाठीही या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्र सरकारच्या आवाहनानुसार ज्या नागरिकांचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने आहे त्यांना नोंदी अपडेट करण्याची गरज आहे. यूआयडीएआयने वाढवलेल्या मुदतीत आधार कार्ड अपडेट केल्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. सर्वप्रधम युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अपडेट आधारचा पर्याय निवडता येईल. तिथे आधार नंबर नोंदवून ओटीपी नंबर द्या. यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपडेट करून पडताळणी करावी लागेल.

बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’ चा जलवा

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस उलटून गेले आहेत. मात्र तरी तिचा जलवा काही कमी होताना दिसत नाहीय. या चित्रपटाने ‘टायगर जिंदा है’ आणि ‘पीके’ ला मागे टाकले आहे. ‘स्त्री 2’ दर दिवशी नवनवे रेकॉर्ड करताना दिसत आहे. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने दमदार कलेक्शन करत देशात 350 कोटींचा आकडा पार केला. यामध्ये दुसऱया शनिवारी म्हणजे 10 व्या दिवशी चित्रपटाने 32.5 कोटी रुपयांची कमाई केली. आकडेवारीनुसार श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ आतापर्यंत 359.5 कोटी रुपयांचे कलेक्शन केलंय. हा चित्रपट 350 कोटींच्या क्लबमध्ये जाऊन बसला.

त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला…

बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने मल्याळम दिग्दर्शक रंजित यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2009 साली चित्रपटाच्या ऑडिशनवेळी आपल्याला आलेला धक्कादायक अनुभव तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. ज्यामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. मुलाखतीत श्रीलेखा हिने म्हटलंय, ‘पालेरी माणिक्यमः ओरु पथिरकोलापथकाथिन्ते कथा’ या चित्रपटाच्या ऑडिशनला गेल्यावर दिग्दर्शकाने मला बेडरूममध्ये बोलावले. त्याने माझ्या बांगड्यांना स्पर्श केला. त्यानंतर मी घाबरले. त्यांनी माझ्या मानेवर हात फिरवला, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असे ती म्हणाली.

प्रसिद्धीसाठी रस्त्यावर उडवायचा पैसे

प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. हैदराबादमधील असाच एक यूट्यूबर प्रसिद्धीसाठी रस्त्यावर पैसे उडवायचा. हे पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी व्हायची. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर कारवाई केली आहे. हैदराबादमध्ये काही यूट्यूबर रस्त्यावर पैसे उडवायचे. त्यामुळे हे पैसे घ्यायला गर्दी व्हायची आणि गोंधळ उडायचा. याबाबतचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत सुधाकर नावाच्या एका नागरिकाने याप्रकरणी कारवाई करण्याची विनंती पोलिसांना केली होती. अखेर याप्रकरणी पोलिसांनी आता तिघांना ताब्यात घेतले आहे.

‘मुंज्या’ ओटीटीवर घालणार धुमाकूळ

जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित केलेल्या या हिंदी चित्रपटाने सर्वांची मनं जिंकली. शर्वरी वाघ, मोना सिंह, अभय वर्मा, सुहास जोशी आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आता ओटीटीवर आला आहे. रविवारपासून हॉटस्टार उपलब्ध झाला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या इन्स्टाग्राम पेजवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आलंय. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट आहे. ‘मुंज्या’ हा कोकणात मानल्या जाणाऱ्या भुताचा प्रकार आहे.