जगभरातील महत्वाच्या अपडेट

ज्येष्ठ वैज्ञानिकाचा संशयास्पद मृत्यू

ओडिशातील जीवन विज्ञान संस्था (आयएलएस) मधील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. संदीप कुमार मिश्रा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. डॉ. संदीप मिश्रा यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी त्यांचा मृत्यू हा चिकन फ्राय खाल्ल्यानंतर झाल्याने मृत्यूमागे घातपात असू शकतो, असे बोलले जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अमेरिकेत हिंदुस्थानी डॉक्टरची हत्या

अमेरिकेतील अलबामा राज्यातील टस्कालुसा शहरात मूळचे हिंदुस्थानी डॉक्टर रमेश बाबू पेरामसेट्टी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ते गेल्या 38 वर्षांपासून डॉक्टर म्हणून काम करत होते. डॉ. पेरामसेट्टी हे मूळचे आंध्र प्रदेशातील तिरुपती जिह्यातील रहिवासी होते. ते टस्कालुसा येथे प्रसिद्ध डॉक्टर होते. कोविडच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचे अमेरिकेकडून कौतुक करण्यात आले होते. या ठिकाणी एका रस्त्यालाही त्यांचे नाव देण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली आहेत.

उत्तर कोरियाची आत्मघाती ड्रोन चाचणी

उत्तर कोरियाने आत्मघाती ड्रोन तयार केल्यानंतर त्याची चाचणी केली. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी स्वतः या ड्रोनच्या चाचणीचे परीक्षण पाहिले. उत्तर कोरियाच्या मीडिया केसीएनएने सोमवारी या ड्रोनच्या टेस्टचा फोटो जारी केला. किम जोंग उन यांनाही या फोटोत पाहिले जाऊ शकते. हा एक असा ड्रोन आहे, जो आपल्या लक्ष्याला धडक देऊन स्वतः नष्ट होतो. तसेच जे लक्ष्य आहे त्याला संपूर्णपणे नष्ट करतो. शत्रूंच्या टँकचे नामोनिशाण मिटवण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे.

टोमॅटोची लाली उतरली, भाव 30 रुपये किलो

टोमॅटोच्या किमती प्रचंड प्रमाणात घसरल्या आहेत. महिनाभराआधी टोमॅटोचे दर 900 रुपये ते 1 हजार रुपये प्रति क्रेटने विकले जात होते, परंतु ते आता केवळ 250 ते 350 रुपये प्रति क्रेटवर आले आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या किमतीत 60 ते 70 टक्के घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला असून टोमॅटोच्या लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

पाच वर्षांच्या मुलाने सर केला किलिमांजारो पर्वत

पंजाब येथील अवघ्या पाच वर्षांच्या मुलाने आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे. किलिमांजारो पर्वतावर चढणारा हा मुलगा आशियातील सर्वात छोटा मुलगा आहे. त्याचे नाव तेगबीर सिंग असून त्याचे वय अवघे पाच वर्षांचे आहे. तेगबीरने 18 ऑगस्ट रोजी किलिमांजारो पर्वतावर जाण्यासाठी प्रवास सुरू केला होता. त्यानंतर 23 ऑगस्टला पर्वताचे सर्वोच्च शिखर उहुरू येथे चालत पोहोचला. अशी कामगिरी करणारा तेगबीर हा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे.

पॅसिफिक महासागरावरून असा दिसतो ‘चांदोबा’

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा) ने पॅसिफिक महासागराच्या वरून चंद्राचा एक खास फोटो कॅप्चर केला आहे. हा फोटो यूएस स्पेस एजन्सीच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक, जे जवळजवळ चार महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करत आहेत. त्यांनी हा फोटो काढला आहे. प्रशांत महासागरावरून हवाई जवळ उष्णकटिबंधीय वादळ होन शूट करण्यासाठी कपोलामध्ये आम्ही गेलो. परंतु, आम्ही वादळाची भीड न बाळगता ते पार करत असताना चंद्र मावळू लागला होता,’ असे डॉमिनिकने फोटोला कॅप्शन देताना म्हटलेय.

ढाक्यातील मेट्रो सेवा पुन्हा सुरू

बांगलादेशातील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आलेली ढाक्यातील मेट्रो सेवा 30 दिवसांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. मेट्रो सेवा सुरू करण्यात आली असली तरी अद्याप दोन स्टेशन मीरपूर 10 आणि काझीपाडा येथील सेवा बंद ठेवली जाणार आहे. जुलैमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आल्यानंतर या दोन स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. बांगलादेशात हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.

ओडिशामध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक

ओडिशामध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे रविवारपर्यंत सुमारे पाच हजार कोंबड्या मारण्यात आल्या. पिपिली येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये एकाच वेळी अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य शासनाने तत्काळ एक पशु वैद्यकीय पथक घटनास्थळी पाठवले. पोल्ट्रीमधून काही नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवले. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शनिवारपासूनच या पोल्ट्री फार्मसह या भागातील इतरही कोंबड्या मारण्याचे काम हाती घेण्यात आलेय.