टॅरिफ लादणे बेकायदेशीर, ट्रम्प यांना कोर्टाचा झटका

हिंदुस्थानसह अनेक देशांविरोधात ‘टॅरिफ वॉर’ सुरू करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस कोर्ट ऑफ अपिल्स द फेडरल सक्रिट यांनी जोरदार झटका दिला आहे. राष्ट्राध्यक्षांना आणीबाणीच्या परिस्थितीत काही अधिकार आहेत; पण त्यामध्ये टॅरिफ लादण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी टॅरिफ लादणे बेकायदेशीर आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय कोर्टाने दिला आहे.

अमेरिकेतील या अपील कोर्टाचा निर्णय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना धक्का मानला जात आहे, मात्र या निर्णयाविरोधात ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने अपील कोर्टात 1977 साली लावलेल्या टॅरिफचा हवाला दिला होता. राष्ट्राध्यक्षांना इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्टचा उपयोग करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले, मात्र अपील कोर्टाने हे दावे फेटाळताना टॅरिफ लादणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे.

कोर्टाचा निर्णय उद्ध्वस्त करणारा

अपील कोर्टाचा निर्णय उद्ध्वस्त करणारा आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करू, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. कोर्टाने निर्णय दिला म्हणजे लगेच टॅरिफ रद्द झाले असे नाही. कोर्टाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आमचाच विजय होणार. टॅरिफचा उपयोग राष्ट्र हितासाठी आहे. टॅरिफ हटवले तर अमेरिकेपुढे मोठे संकट उभे राहील, असे ट्रम्प म्हणाले.