
काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या साठवून ठेवलेला रेशनचा तब्बल सहा टन तांदूळ देवळाली प्रवरा येथील खंडोबा मंदिरासमोरील राजळे वस्तीवरील एका खोलीत सापडला आहे. तो महसूल विभागाने पंचनामा करून जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
देवळाली प्रवरा येथील किराणा दुकानदार आनंदा लखमीचंद देसर्डा याने खंडोबा मंदिरासमोरील राजळे वस्तीवर भाडोत्री खोल्या घेऊन या खोल्यांमध्ये रेशनच्या तांदळाचा साठा केला होता. मंगळवारी रात्री या ठिकाणी एक मालट्रक शासकीय गोण्यातील रेशनचा तांदूळ खाली करण्यासाठी आला होता. हा ट्रक खाली करण्यापूर्वीच नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला. मात्र, त्यानंतर हा ट्रक गायब करण्यात आला. या ट्रकचे छायाचित्रण अज्ञात व्यक्तीने केले. ते छायाचित्रण राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांना पाठविण्यात आले होते. तहसीलदारांनी याची दखल घेऊन नायब तहसीलदार सचिन औटी, पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर, अविनाश ओहळ, मंडलाधिकारी बाळकृष्ण जाधव, तलाठी दीपक साळवे, गोडावूनप्रमुख राहुल जाधव आदींचे पथक पाठवून रेशनच्या तांदूळप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
नायब तहसीलदार सचिन औटी यांच्या पथकाने देवळाली प्रवरा येथील खंडोबा मंदिरासमोरील राजळे वस्तीवर आनंद लखमीचंद देसर्डा याने साठवून ठेवलेल्या तांदळाच्या ठिकाणी छापा टाकून सुमारे सहा टन तांदूळ जप्त केला आहे. दुपारी 12 वाजता सुरू झालेली कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. राहुरी येथील पुरवठा विभागाच्या वतीने बोलविण्यात आलेल्या ट्रकमध्ये तांदूळ भरून राहुरी येथे नेण्यात आला. पुरवठा विभागाने अंदाजे सहा ते सात टन तांदूळ असण्याची शक्यता वर्तविली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
ट्रकसोबत असलेली व्यक्ती महसूलच्या छाप्यातही सहभागी
बुधवारी पहाटे शासकीय गोण्यात भरलेला तांदूळ आनंद देसर्डा यांच्या गोडावूनमध्ये बारदाना बदलून खाली करत असताना पुरवठा विभागातील गोडावून विभागात काम करणारी व्यक्ती उपस्थित होती. तांदळाने भरलेल्या ट्रकचे छायाचित्र तहसीलदार शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकास छापा टाकण्याचे आदेश दिले असता, या पथकात पुरवठा विभागातील गोडावूनमधील तीच व्यक्ती उपस्थित होती. ट्रकसोबत होती तीच व्यक्ती छापा टाकण्यासाठी आल्याचे दिसल्याने उपस्थित किराणा दुकानदार व इतर काही व्यक्तींनी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
देवळाली प्रवरा येथे रेशनचा तांदूळ पकडला आहे. तांदूळ जप्त केलेला आहे. तांदळाचे वजन करून त्याची किंमत काढून पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. रेशनच्या तांदूळ साठय़ाची काळ्या बाजारात विक्री करणाऱयांची गय केली जाणार नाही.


























































