रशिया युद्धविरामासाठी तयार, पण पुतीन यांनी ठेवल्या 4 अटी; युक्रेन झुकणार की महासत्ता अमेरिका एक पाऊल मागे घेणार?

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आजतागायत शेकडो जवानांसह सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. तसेच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असून अमेरिकेची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यात जातीने लक्ष घातले आहे. नुकतीच सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये अमेरिकने 30 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव सादर केला आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर आता रशियानेही यावर सहमती दर्शवली आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काही अटी ठेवल्या आहेत.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले की, युक्रेनसोबत 30 दिवसांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाशी तत्वत: सहमत आहे. पण काही अटींवर काम करणे आवश्यक असून यामुळे कायस्वरुपी शांतता प्रस्थापित होईल. ते मॉस्को येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. तसेच काही मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

रशिया युद्धविरामासाठी तयार, पण पुतीन यांनी ठेवल्या 4 अटी; युक्रेन झुकणार की महासत्ता अमेरिका एक पाऊल मागे घेणार?

युद्धविरामाच्या प्रस्तावाशी आम्ही सहमत आहोत. परंतु कायस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही अटी मान्य कराव्या लागतील. या अटी मान्य झाल्या तरच युद्धविरामला मान्यता देण्यात येईल, असे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या अटींवर आता युक्रेन आणि अमेरिकेकडून काय प्रतिक्रिया येते यावर रशिया-युक्रेन युद्धविरामाचे भवितव्य अवलंबून आहे.

काय आहेत अटी?

– युक्रेनला नाटो गटाचे सदस्यत्व मिळू नये अशी अट रशियाने अमेरिकेपुढे ठेवली आहे. युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळाले तर रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती पुतीन यांना वाटत आहे

– नाटोचे सदस्य असलेल्या कोणत्याही देशाच्या सैन्य गटाने युक्रेनमध्ये लष्करी तळ उभारू नये किंवा लष्कर तैनात करू नये आणि रशियाच्या विरोधात आघाडी तयार करू नये, अशी दुसरी अट रशियाने ठेवली आहे.

– क्रिमीया आणि युक्रेनमधील डोनेत्स्क, लुहान्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसॉन या भागांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी, अशी तिसरी अट रशियाने ठेवली आहे.

– नाटोचा विस्तार थांबवावा, अशी चौथी आणि अंतिम अट रशियाने ठेवली आहे.