
द लॅन्सेट ऑब्स्टेट्रिक्स, गायनॅकोलॉजी अँड विमेन्स हेल्थ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासानुसार, हिंदुस्थान अजूनही जगातील सर्वाधिक माता मृत्यू असलेल्या देशांपैकी एक आहे. गेल्या काही दशकांत लक्षणीय घट झाली असली तरी 2015 नंतर या प्रगतीचा वेग मंदावल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
अभ्यासानुसार, 2023 मध्ये जगभरात गर्भधारणा आणि प्रसूतीशी संबंधित कारणांमुळे सुमारे 2.4 लाख महिलांचा मृत्यू झाला. त्यापैकी हिंदुस्थानमध्ये सुमारे 24,700 महिलांचा मृत्यू झाला असून, नायजेरिया, पाकिस्तान आणि इथिओपिया यांच्यासह हिंदुस्थान उच्च-जोखीम देशांमध्ये समाविष्ट आहे.
हिंदुस्थानच्या दीर्घकालीन आकडेवारीकडे पाहिल्यास प्रगती आणि आव्हाने दोन्ही दिसून येतात. 1990 मध्ये सुमारे 1.19 लाख माता मृत्यू होते, ते 2015 मध्ये 36,900 वर आले आणि 2023 मध्ये आणखी घट होऊन 24,700 वर पोहोचले. माता मृत्यू दर (MMR) देखील 1990 मधील 508 वरून 2023 मध्ये प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे 116 पर्यंत खाली आला आहे.
डॉ. आभा मुजूमदार यांनी सांगितले की, “जागरूकता वाढणे, संस्थात्मक प्रसूती आणि सरकारी योजना यामुळे 1990 पासून माता मृत्यूंमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र, राज्यनिहाय प्रगती असमान आहे. केरळ आणि तामिळनाडू जागतिक लक्ष्यांच्या जवळ आहेत, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये अजूनही मृत्यू दर जास्त आहे.”
2000 ते 2015 या काळात सर्वाधिक घट झाली. संस्थात्मक प्रसूतीत वाढ, प्रसूतीपूर्व तपासणी (antenatal care) सुधारणा आणि सार्वजनिक आरोग्य सेवांचा विस्तार यामुळे ही प्रगती साध्य झाली. मात्र, अलीकडच्या काळात घटीचा वेग कमी झाला असून, आरोग्य व्यवस्थेतील काही मूलभूत समस्या अजूनही कायम आहेत.
अभ्यासानुसार, हिंदुस्थानमध्ये माता मृत्यूंची प्रमुख कारणे टाळता येण्यासारखी आहेत—जसे की अतिरक्तस्त्राव (haemorrhage), उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या, संसर्ग आणि आधीपासून असलेल्या आजारांशी संबंधित गुंतागुंत. वेळेत उपचार न मिळणे, सेवांच्या गुणवत्तेत तफावत आणि ग्रामीण-शहरी भागांतील असमानता ही प्रमुख कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर 2023 मध्ये माता मृत्यू दर प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे 190 इतका होता, जो संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार (SDG) 70 पेक्षा कमी असायला हवा. मात्र, अर्ध्याहून अधिक देश अजूनही या लक्ष्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. कोविड-19 महामारीमुळे मातृ आरोग्य सेवांवर परिणाम झाला आणि काही भागांत मृत्यूंची संख्या वाढल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, हिंदुस्थानने आतापर्यंत केलेली प्रगती टिकवून ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करणे, उच्च-जोखीम गर्भधारणा आणि वंचित घटकांसाठी सेवा सुधारण्याची गरज आहे. प्रगतीचा वेग मंदावल्याने आणि धोके कायम असल्याने 2030 पर्यंत सर्व महिलांसाठी सुरक्षित प्रसूतीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नव्याने प्रयत्नांची गरज असल्याचा इशाराही या अभ्यासातून देण्यात आला आहे.



























































