दबावतंत्राचा वापर करून खारेगावातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची शाखा काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. मात्र जिगरबाज शिवसैनिकांनी हार न मानता नव्या जोमाने कळव्याच्या खारेगावात नवीन शाखा उभी केली आहे. मिंध्यांच्या नाकावर टिच्चून हे ‘न्याय मंदिर’ उभे राहिल्याने या परिसरातील नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळणार आहे. दरम्यान शाखेच्या उद्घाटनानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत आगामी निवडणुकांमध्ये गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार केला.
राज्यात खोके सरकार आल्यानंतर सत्ता आणि यंत्रणेच्या जीवावर मिंध्यांच्या बगलबच्च्यांनी गुंडगिरी करत ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबईतील शिवसेनेच्या काही शाखा बळकावल्या होत्या. अशाच प्रकारे खारेगावात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नव्याने शाखा उभी केली होती. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील या शाखेला भेट देत शिवसैनिकांनी मार्गदर्शन केले होते. त्यामुळे पेटून उठलेल्या शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत जोरदार काम करत मिंध्यांना घाम फोडला. हीच पोटदुखी झाल्याने मिंध्यांनी जागा मालकावर दबाव टाकला आणि ही शाखा बंद करण्यास भाग पाडले. परंतु शिवसैनिकांनी मागे न हटता नवीन जागेचा
शोध सुरू केला.
ज्येष्ठ शिवसैनिकांचा गौरव
कळवा – खारेगाव भागातील शिवसैनिक राजाराम भुवड, सुधाकर पितळे, चंद्रकांत शिंदे, विलास खेडेकर, जगदीश चौधरी, गुलाब काळे यांनी शाखेसाठी नवीन जागा शोधली. इतकेच नाही तर शिवसेना उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे यांच्या हस्ते या नवीन जागेतील शाखेचे लोकार्पण केले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी सर्व शिवसैनिकांनी शपथ घेत जोमाने काम करून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला.