
पालिकेच्या माध्यमातून माटुंगा किंग्ज सर्कल परिसरातील माटुंगा जिमखाना परिसरात रस्ते विस्तारीकरणासाठी 30 झाडे तोडली जाणार आहेत. यासाठी पालिकेच्या एफ/उत्तर विभागाने परवानगीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. मात्र ही झाडे तोडण्यास स्थानिकांनी विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या एफ-उत्तर विभागातील इंडियन जिमखाना आणि मुंबई महानगरपालिका यांच्यातील करारानुसार इंडियन जिमखान्याच्या ताब्यातील खेळाच्या मैदानाची 20 मीटर जागा रुंदीकरणात आली आहे. मात्र या जागेत झाडे असल्याने स्थानिकांनी विरोध केला आहे. झाडे तोडल्यास कोणताही रस्ते विस्तारीकरणाचा उद्देश साध्य होणार नाही. फक्त एफएसआय वाढीव मिळावा आणि रिअल इस्टेटला जागा वापरता यावी हाच एकमेव उद्देश या झाडांच्या कापणीच्या प्रकल्पामागे आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. या रस्ता विस्तारीकरणामुळे सध्याच्या मैदानाची जागाही कमी होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत [email protected] वर हरकती-सूचना मागविल्या आहेत.

























































