
बिहारमधील सभेत काँग्रेसच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपमानजनक भाषेचा वापर केल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज पाटण्यातील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केले. त्या वेळी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना झेंड्याच्या दांड्यांनी मारले. तसेच एकमेकांवर दगडफेकही केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार अधिकार यात्रा’ सुरू आहे. ही यात्रा दरभंगा येथे असताना झालेल्या सभेत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मोदी व त्यांच्या दिवंगत आईविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पाटणा येथील कार्यालयाबाहेर मोर्चा काढला व निदर्शने केली. त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर दिल्याने धुमश्चक्री उडाली. यात दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
हे भाजपच्या एजंटचे काम
काँग्रेसचे प्रकक्ते पकन खेरा यांनी या राड्यासाठी भाजपलाच जबाबदार धरले. ‘मोदींबद्दल अपमानास्पद बोलणारा भाजपचाच एजंट होता. मतदार अधिकार यात्रेत गोंधळ घालण्यासाठी भाजपचा हा डाक आहे. मतांची चोरी पकडली गेल्यामुळे भाजपकाले बिथरले आहेत. मोदींबद्दल अपशब्द बोलणारा कोण होता हे शोधून काढा आणि त्याला अटक करा, सगळे सत्य समोर येईल, असे खेरा यांनी सुनाकले.
राहुल गांधी म्हणाले, सत्यमेव जयते!
राहुल गांधी यांनी भाजपचे आरोप व राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘सत्य आणि अहिंसेपुढे असत्य आणि हिंसा टिकू शकणार नाही. तुम्ही हवी तितकी ‘फोडा आणि झोडा’ नीती राबवा, पण आम्ही सत्य आणि संविधानाचे रक्षण करणे सुरूच ठेवणार. सत्यमेव जयते’’, असे राहुल यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.