वाड्यातील ब्लू स्टार कंपनीत भारतीय कामगार सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन, कामगारांनी व्यक्त केला आनंद

blue-star

कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या भारतीय कामगार सेनेला कारखाने, कंपन्या आदी विविध आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचा भरभरून प्रतिसाद कायमच मिळत आला आहे. वाडा येथील नामांकित ब्लू स्टार कंपनीमध्ये भारतीय कामगार सेनेची मान्यताप्राप्त युनियन आहे. या कंपनीमध्ये आता भारतीय कामगार सेनेच्या कार्यालयाला हक्काची जागा मिळाली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले.

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा पार पडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने या कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याने कामगार चळवळ आणखी बळकट होईल अशी भावना संजय शंकर कदम यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच युनिट पदाधिकाऱ्यांना कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ब्लू स्टार वाडा युनिटचे जनरल मॅनेजर अमित मेहता, भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस दिनेश पाटील, युनिट अध्यक्ष किरण मालप, उपाध्यक्ष योगेश पाटील, चिटणीस शाहनवाज मन्सुरी, खजिनदार गणेश पाटील, नितीन तरे, सुधीर पटारे, नीलेश गोळे उपस्थित होते.

कामगारांच्या एकजुटीचे कौतुक

ब्लू स्टार कंपनीमध्ये भारतीय कामगार सेनेच्या युनिटची स्थापना आणि कार्यालय सुरू करण्यासाठी कामगारांनी दाखवलेल्या एकजुटीचे संजय कदम यांनी कौतुक केले. तसेच कामगारांना एकसंघ राहण्याचा सल्ला देऊन कामगारहिताच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.