पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत उत्पन्नाला खीळ बसल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत दोन हजार ७२ कोटींचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे. हे उत्पन्न उद्दिष्टांपेक्षा पन्नास टक्के कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मूळ ५ हजार ८४१ कोटी ९६ लाख, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ८ हजार ६७६ कोटी ८० लाख रुपयांचे अंदाजपत्रक आहे, तर महापालिकेला संपूर्ण वर्षात जीएसटी, कर संकलन, बांधकाम परवानगी विभाग, मुद्रांक शुल्क, पाणीपुरवठा, इतर विभागांसह ठेवींवरील व्याज असे वर्षाला ५ हजार ८३२ कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहीत धरण्यात आले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा कर संकलन आणि बांधकाम परवानगी विभाग आहे. कर संकलन विभागाला १ हजार ५० कोटी, तर बांधकाम परवानगी विभागातून वर्षाला ९५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. परंतु, पहिल्या सहामाहीत कर संकलन विभागाने जुन्या थकबाकीसह ५०५ कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे. हा विभाग गतवर्षापेक्षा ७४ कोटींच्या पिछाडीवर आहे, तर बांधकाम विभागाला २४५ कोटी २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे दोन्ही विभाग पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहेत.
दरम्यान, २०२१-२२ मध्ये पहिल्या सहामाहीत महापालिकेला १ हजार ७३८ कोटी १२ लाख, २०२२-२३ मध्ये १ हजार ७५६ कोटी ५२ लाख, २०२३-२४ मध्ये १ हजार ९९८ कोटी ६५ लाख, तर २०२४-२५ या आर्थिक वर्षात २ हजार ७२ कोटी २७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.